A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हृदयिं धरा हा बोध

हृदयिं धरा हा बोध खरा । संसारीं शांतिचा झरा ॥

संशय खट झोटिंग महा । देउं नका त्या ठाव जरा ॥

निशाचरी कल्पना खुळी । कवटाळिल ही भीति धरा ॥

बहुरूपा ती जनवाणी । खरी मानितां घात पुरा ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- शरद जांभेकर
बालगंधर्व
मधुवंती दांडेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संशयकल्लोळ
राग - पिलू
चाल-जल जयो ऐसी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
खटनट - त्रास, कटकट.
झोटिंग - पिशाच्च.
टीप- नाटकाच्या प्रकाशित पुस्तकावर त्याचे नाव 'संशय-कल्लोल' असे छापले आहे.

सुमारें सतरा वर्षापूर्वी मित्रवर्य गोविंदराव देवलांच्या 'शारदा' नाटकाला प्रस्तावना लिहिली तेव्हांची माझी मनःस्थिति आणि आज त्यांच्या पश्चात् त्यांच्या वडील बंधूंच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रस्तुत प्रहसनाला प्रस्तावना लिहितों आहें, या वेळची मनःस्थिति दोहींत केवढें अंतर ! 'शारदे'च्या प्रस्तावनेंत कविमित्राची प्रतिभा निरतिशय सुंदर असें अपत्य प्रसवली म्हणून अभिनंदन केलें; प्रस्तुत प्रस्तावनेंत त्याची ती प्रतिभा दिवंगत झाली म्हणून शोक-निवेदन करण्याचा प्रसंग ओढवला आहे. त्यांतही प्रस्तुत लेखकास ही प्रस्तावना लिहितांना विशेष विव्हल होण्याचें एक मोठे कारण हें की, दोघांनी मिळून एक नवीन नाटक रचण्याचा संकल्प ठरला होता. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठीं थोडीशी पूर्वतयारीही झाली होती. परंतु आता,
मनींच्या मनीं कल्पना त्या निमाल्या
या खेदोत्पादक विचाराखेरीज त्यांतला कांहींही शेष उरला नाहीं.

कै. गोविंदरावांची नाट्यकला किती वरिष्ठ दर्जाची होती, हें महाराष्ट्रांत कोणास वर्णन करून सांगण्याची आवश्यकता मुळींच नाहीं. त्यांची नाट्य-कविता आबालवृद्धांच्या तोडीं झाली आहे; आणि 'शारदे'च्या पाठोपाठ आणखी एखादी कृति ते केव्हां महाराष्ट्राला अर्पण करतील, म्हणून महाराष्ट्रजन चातकाप्रमाणें तृषित होऊन त्यांच्याकडे डोळे लावून बसला होता, तों गेल्या जून महिन्याच्या १४ व्या तारखेस त्या काव्यमेघाचें जीवन नष्ट झाल्याची दुःखद वार्ता कानी आली. अर्थातच सर्व आशा जेथल्या तेथेंच जिरल्या.

प्रस्तुत नाटकांतील पद्यें हीं देवलांच्या हातचीं शेवटचींच पद्यें होत. ते जर आणखी कांही काल जगते तर महाराष्ट्र नाट्यवाङ्मयांत आणखी एखाद्या तरी सुंदर व बोधप्रद नाटकाची खरोखर भर घालते. त्यांचे हातून एकंदर सात नाटके निर्माण झालीं, ती अनुक्रमें येणेंप्रमाणें होतः
१ अथेल्लो- झुंजारराव (रंगावृत्ति)
२ दुर्गा नाटक
३ फाल्गुनराव
४ संगीत शारदा
५ संगीत मृच्छकटिक
६ संगीत विक्रमोर्वशीय
७ संगीत शापसंभ्रम
यांपैकी एक 'शारदा' नाटक खेरीज करून बाकी सर्व नाटकें इंग्रजी अगर संस्कृत कवींच्या कृतींवर आधारलेलीं आहेत.

ते स्वतः अत्यंत उत्तम नट होते. 'आर्योद्वारक मंडळी'च्या नाटकांत से नायकाची भूमिका घेत. 'अथेल्लो'त ते अथेल्लोचा भाग इतका उत्तम वठवीत कीं, जणूं काय त्यांच्यासारखा अभिनय होणार नाही या शंकेने त्यांच्या पश्चात, अद्यापि 'अथेल्लो' नाटक कोणी केलेंच नाहीं. स्वतः नट होऊन रंगभूमीशी गाढ परिचय असल्याखेरीज कलेच्या दृष्टीनें नाटकरचना उत्तम होणें दुर्घटच होय. त्यांच्या 'दुर्गा' नाटकास कोल्हापूर सरकारानें बक्षिस दिलें. 'संगीत शापसंभ्रम' यांस इंदूर सरकाराकडून हजार रुपये बक्षिस मिळालें. त्यांच्या सर्वच कृति मनोहर, परंतु त्यांतल्या त्यांत 'शारदा', 'शापसंभ्रम' व 'मृच्छकटिक' या त्रयीनें आपलें जनमनोहरत्व प्रत्येकाच्या प्रतीतीस आणून दिले.

ललितकलांशी त्यांचा लहानपणापासून गाढ परिचय. त्यांचे एक बंधु उत्तम नट होते. दुसरे बंधु सरकारी नौकरींत उत्तम पदवी मिळवून आतां संगीत- शास्त्र व कला यांना आपला उर्वरित आयुर्दाय वाहून त्यांच्या प्रसारार्थ उत्कट प्रयत्‍न करीत आहेत. गोविंदरावांनीं इंग्रजी शिक्षण मिळवून, सरकारी सेवेची चव घेऊन नाट्यकलेच्या प्रेमामुळें तिचा परित्याग केला. नाट्यकलेचें त्यांनी अध्ययन आणि अध्यापन केलें. स्वतः उत्तम नट म्हणून कीर्ति मिळवून कित्येक नामांकित नटांना शिक्षण दिलें. गद्यपद्य नाट्यरचना केली, आणि नाट्याचार्य ही पदवी मिळविली. शेवटली काही वर्षे त्यांनीं थिऑसफीत शिरून अध्यात्मविषयांतही उत्कृष्ट परिचय करून घेतला होता; आणि अध्यात्मविचाराच्या भरात असतानाच त्यांचा अंत झाला.

'शारदा' नाटक लिहून झाल्या वेळेपासून गोविंदरावांच्या मित्रमंडळीनीं "तुम्ही आणखी एखादें नाटक लिहा" म्हणून त्यांचा पाठपुरावा चालविला होता. परंतु अनेक कारणांमुळें त्याचे हातून नवीन कृति निर्माण झाली नाहीं. तेव्हां, "निदान तुमच्या 'फाल्गुनरावा'स संगीताची जोड देऊन त्याचा नवा अवतार करावा", असें त्यांस विनविण्यांत आल्यावरून त्यांनी प्रस्तुत पुस्तक तयार केलें, असा प्रस्तुत पुस्तकाचा इतिहास आहे. त्याचा संगीत प्रयोग प्रसिद्ध गंधर्व नाटक मंडळींनी येत्या नवंबर महिन्याच्या प्रारंभीच करण्याचें ठरविलें आहे, त्याप्रमाणे तो प्रयोग होईलही. परंतु गोविंदराव मात्र आपल्या त्या फाल्गुनरावाच्या 'संगीत संशय-कल्लोल'नें उठणार्‍या हास्यकल्लोलांचें कौतुक करण्याला नाहीत, हें पाहून कोणाच्या मनांत शोक-कल्लोल उठणार नाहीं?

'फाल्गुनरावा'चा गद्यावतार रा. देवल यांनी १९०३ साली प्रसिद्ध केला तेव्हां त्यांनी स्वतःच प्रस्तावना लिहिली, ती अशी:- "फाल्गुनराव मूळचा विलायती. पण त्याला इकडची भाषा शिकवून, त्याच्या अंगावर इकडील कपडे चढवून इकडील चालीरीतींची त्यास चांगली माहिती करवून, लोकसेवेस सादर केला आहे. फाल्गुनराव मोठा गमती आहे. त्याच्या भाषणानें हंसूं यावयाचें नाही, असा मनुष्य विरळाच सापडेल. कित्येक अत्यंत नीतिभक्त त्यास अभद्र बोलणारा असें कदाचित म्हणतील, पण वास्तविक तो तसा नाही, हे अनुभवानी रसिक व मर्मज्ञ लोकांस कळून येईल."

याच फाल्गुनराबास यंदा गोविंदरावांनी थोडे संगीतही शिकवून लोकसेवेस सादर केले आहे. रा. बालगंधर्व, रा. बोडस व त्यांचे सर्व नटमित्र त्याच्याकडून लोकसेवा उत्तम प्रकारें घडवतील याबद्दल कोणासच शंका नाहीं.

आता फाल्गुनरावाच्या अंतर्यामासंबंधानें थोडीशी चिकित्सा करूं. 'अस्थानी आणि अकारण संशय' हे फाल्गुनराव, कृत्तिका, रेवती आणि आश्विनशेट यांच्या अंतर्यामातले व्यंग. त्यांच्या त्या संशयाला उद्दीप्त करण्याला त्यांची तीच कारण. अर्थातच ज्याचा त्याचा मूर्खपणा ज्याचा त्यालाच भोंवला म्हणजे त्याचे जनांत हंसू होते. तसेच हंसूं फाल्गुनरावांचें व इतर पात्रांचें झालें. त्याच्या संशयकल्लोलात गढून जाण्यानें परस्परांच्या घातापर्यंत मजल आली नाही त्यामुळे त्याचें पर्यवसान हास्यमय झालें. त्यांची कींव मात्र कोणासही येत नाही. परस्परांच्या प्रेमनिष्ठेबद्दल संशय, आणि तो अगदी अकारण, यामुळें त्यांच्या मनास किती जरी वेदना झाल्या तरी त्यांच्या त्या वेदनांना वाचक-प्रेक्षकांकडून तर काय, परंतु त्यांच्या त्यांच्या चाकरांनौकरांकडूनही व स्‍नेह्यांसोबत्यांकडून सुद्धा केव्हांही सहानुभूति मिळाली नाही, त्यांच्या संशयकल्लोलाचा मोबदला सर्वांच्या हास्यकल्लोलांतच मिळावयाचा. आपल्या मूर्खपणानेंच ही आपली फजिती उडवून घेणार ही जाणीव ज्याला त्याला असते.

शेक्सपिअरच्या 'अथेल्लो' नाटकाचा व 'ए वुइंटर्स टेल' या नाटकाचा विषय 'अकारण संशयकल्लोल'च होय. परंतु या दोन नाटकांतील संशयकल्लोलाचें पर्यवसान निर्मल व सत्त्वस्थ नायिकांच्या घातापर्यंत पोंचलें. अर्थात् त्या संशयकल्लोलाच्या आघातांनीं वाचक-प्रेक्षकांच्या अंतःकरणांत विव्हलता आणि नेत्रांत दुःखाश्रू ही उद्भवतात. फाल्गुनरावाच्या संशय-कलोल्लास 'जशास तशा' नायिकांकडून तोडीस तोड मिळाल्याकारणानें हास्याखेरीज दुसरें पर्यवसानच नाहीं.

विषय जरी एक असला, विकर जरी एक असला तरी त्यांच्या विकास-भिन्‍नतेमुळे परस्परभिन्‍न अशा रसांचा कसा परिपोष होतो, हे पाहणें मोठे गमतीचे आहे.

O, beware, my lord, of jealousy.
It is the green-eyed monster which doth mock. The meat it feeds on.
Othello Act III. Sc. III 165-7.

हा धडा शेक्सपिअरने अथेलोंत वाचक-प्रेक्षकांचे हृदय शोकविदीर्ण करून शिकविला. तोच फाल्गुनरावाच्या कर्त्यानें आपल्या नायकाच्या व त्याच्या समानशील पात्रांच्या मूर्खपणाचें प्रदर्शन करून हंसवून हंसवून शिकविला आहे.

संशय खट झोटिंग महा । देउं नका त्या ठाव जरा ॥
निशाचरी कल्पना खुळी । कवटाळल ही भीति धरा ॥
बहुरूपा ती जनवाणी । खरी मानितां घात पुरा ॥

इयागोसारख्या दुष्टाच्या कारस्थानांनी उद्दीप्त केलेल्या संशयानें ग्रस्त होऊन अथेल्लोनें आपल्या स्वतःचा व आपल्या उज्ज्वलसत्त्व पत्‍नीचा घात केला. अर्थात् त्याची कींव येते व करुणरसाचा आत्यंतिक परिपोष होतो. लिऑन्टीज (Leontes) चा संशय स्वयंप्रेरित होता. अर्थात् त्याची तितकी कींव येत नाही. मात्र त्याच्या मूर्ख संशयामुळे त्याच्या पतिव्रता पत्‍नीस अत्यंत अन्याय झाला, नुकत्याच जन्मलेल्या मुलीस वनवास भोगावा लागला आणि आवडत्या मुलास मृत्यु आला, यामुळे करुणरसाचाच परिपोष होतो. परंतु फाल्गुनरावाच्या मूर्खपणानें व त्याची सर्व मंडळी एकाच माळेचे मणी असल्या कारणाने हास्यरसाचा प्रवाह सुरू होतो.

हास्याश्रु आणि करुणाश्रु यांच्या उद्गमांचे स्थान एकच, परंतु कारणांच्या भिन्‍नतेवर त्यांचा उद्भव अवलंबून असतो.

अथेल्लो व लिऑन्टीज्‌, यांच्या संशयग्रस्ततेनें "अरेरे !" असा उद्वार निघतो तर फाल्गुनरावाच्या संशयग्रस्ततेनें "भली झाली गुलामाची !" असा उद्गार निघतो, हा अनुभव कोणास नाहीं?
(संपादित)

हरि नारायण आपटे
दि. ३० ऑक्टोबर १९१६
'संगीत संशय-कल्लोल' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- रामचंद्र गोविंद देवल (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  शरद जांभेकर
  बालगंधर्व
  मधुवंती दांडेकर