A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जा झणि जा रावणास सांग

जा, झणि जा, रावणास सांग अंगदा
शेवटचा करि विचार फिरुन एकदां

नगरद्वारिं राम उभा सिंधु लंघुनी
रणरागीं वानरगण जाय रंगुनी
शरण येइ राघवास सोडुनी मदा

वरलाभें ब्रह्माच्या विसरुनी बला
पाप्या, तूं पीडिलेंस अखिल पृथ्विला
छळिसी तूं देव, नाग, अप्सरा सदा

उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा
शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा
जाळिल तव वंश, सर्व राज्य-संपदा

शंखनाद ऐक, देख धरणिकंप ते
तुजसाठीं राक्षसकुल आज संपते
अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा

अंती तरि सोड मूढ वृत्ति आपुली
परतुन दे राघवास देवि मैथिली
शरणागत होइ त्यास, टाळ आपदा

स्थिर राही समरीं रे समय जाणुनी
जातिल तुज रामबाण स्वर्गि घेउनी
वाट उरे हीच एक तुजसि मोक्षदा

नातरि बल मायावी दाव संगरीं
ज्यायोगें हरिली तूं रामसहचरी
वज्राप्रति भिडव बाण, मेरुसी गदा

नामहि तव भूमीवर कठिण राहणें
आपणिली रामकृपा सुज्ञ विभिषणें
लंकेच्या भूषवील तोच नृपपदां
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - सारंग
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २/२/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
अंगद (तारासुत) - वाली आणि तारा यांचा पुत्र.
झणी - अविलंब.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
तृषा - तहान.
नृप - राजा.
प्रभा - तेज / प्रकाश.
मूढ - गोंधळलेला / अजाण.
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).
मद - उन्माद, कैफ
मेरू - एक पर्वत.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.
विभिषण - बिभिषण. रावणाचा भाऊ. सीतेस पळवून आणल्याबद्दल याने रावणास रागावले व तीस परत पाठवण्यास सांगितले. न होता हा रामाकडे गेला. रावणाच्या मृत्यूनंतर रामाने यास राज्य दिले.
संगर - युद्ध.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण