A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जळते मी हा जळे दिवा

पहाट झाली, उद्यानातुन मंदिरी ये गारवा
जळते मी, हा जळे दिवा

वचन देउनी नाही आले
रातभरी मी रडून जागले
सुकली वेणी सुकला मरवा

युद्धाविण हो रणी पराजीत
रुद्ध मनोरथ निराश मन्मथ
आणा चंदन उरी सारवा

ज्योत फिकटली हो अरुणोदय
पुरुषप्रणय हा केवळ अभिनय
स्त्री हृदयाची त्यास न परवा

शृंगाराचा लाथडुनी घट
गोकुळातला गेला खटनट
स्मृती तरी ग माझी हरवा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- माणिक वर्मा
राग - तोडी
गीत प्रकार - हे श्यामसुंदर, भावगीत
  
टीप -
• पुणे आकाशवाणी संगितिका 'पारिजातक' मधील पद.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
अवरुद्ध (रुद्ध) - रोधलेले, अडवलेले.
खटनट - त्रास, कटकट.
मन्मथ - मदन.
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.