A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जमेल तेव्हा जमेल त्याने

जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे

आयुष्याच्या वेलीवरती भावफुले बहरावी
ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी
नक्षत्रांच्या श्वासांतुनही पेरित जावे गाणे

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे

जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला
इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला
जाताजाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे
गीत - रमण रणदिवे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी-रानडे
अल्बम - क्षण मोहरते
गीत प्रकार - भावगीत
उदंड - पुष्कळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी-रानडे