A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जरठबाला योग असा

जरठबाला । योग असा ।
भूस्तरीं योग्य व्याकरणिं तसा । योग असा ॥

हिरा त‌इं दिसे उपलें मघवा श्वानें तुलियेला ॥

न बालरवि त्या बुडत्या । विधुसी संमुख चिर ठेला ॥
उपल - दगड.
चिर - दीर्घ कालपर्यंत.
जरठ - म्हातारा.
ठेला - उभा राहिलेला / कुंठित.
तइं - तेव्हा.
मघवान्‌ - इंद्र.
विधु - चंद्र.
ज्या नाटकांत मजविषयीं एका स्थळीं प्रत्यक्षपणें सद्भाव दाखविला आहे, त्यांतील पद्यें व प्रस्तावना मींच लिहिणें सामान्य परिस्थितीत असदभिरुचीचे दर्शक मानलें जाईल. पण ज्या परिस्थितींत मला तीं लिहावीं लागलीं, तिचा विचार करितां तें क्षम्य वाटेल, अशी आशा आहे.

हा नाटकाचे कर्ते कै. राम गणेश गडकरी यांचा व माझा परम व अकृत्रिम स्‍नेह होता. उभयतांनीं मिळून एखादें नाटक लिहून तें उभयतांच्या नांवांनीं प्रसिद्ध करावें व या रीतीनें नांवें धारण करणारांच्याप्रमाणें त्या नांवांचाहि दृढ संबंध जुळवून आणावा, अशी उत्कट इच्छा त्यांनी कितीतरी वेळां प्रकट केली होती ! ती इच्छा संकल्पित प्रकारापेक्षां अगदींच निराळ्या प्रकारानें पूर्ण व्हावयाची होती !

सन १९१८ सालचे नाताळांत रा. गडकरी पुणें येथें अत्यवस्थ असतां मी त्यांच्या भेटीस गेलों. आपण आतां फार दिवसांचे सोबती नाहीं हें त्यांस कळून चुकले असल्यामुळे त्यांनी त्या वेळी आपल्या वाङ्मयविषयक संसाराची निरवानिरव चालविली होती. त्यापूर्वी त्यांनीं 'एकच प्याला' या नाटकाचें संपूर्ण गद्य, प्रस्तुत नाटकाच्या चार अंकांपेक्षां कांहीं अधिक भागाचें गद्य व दोन्ही नाटकांतील कांहीं पदें स्वतः तयार केली होतीं. त्यांपैकी कोणत्या नाटकाची पद्मावलि पुरी करणें मला आवडेल असा त्यांनीं प्रश्न केला असतां मीं प्रस्तुत नाटकाचे प्रकाशक रा. कृष्णाजी सखाराम हर्डीकर यांच्या व माझ्या स्वतःच्या इच्छेस अनुसरून प्रस्तुत नाटकाची पद्यावलि पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांनीं तें काम मजकडे सोंपविलें, त्या वेळी खुद्द रा. गडकर्‍यांचीं पदें माझ्या अवलोकनांत आली नव्हती. यानंतर लवकरच ते आपल्या प्रेमळ मातुःश्रींस, उभयतां बंधूंस व पत्‍नीस, अनेक स्‍नेह्यांस व व्यवसायबंधूंस आणि मराठी भाषेच्या असंख्य अभिमान्यांस शोकांत लोटून देऊन दिवंगत झाले.

त्यांच्या मृत्यूमुळे मराठी भाषेचें व वाङ्मयाचें कधींहि न भरून निघण्यासारखें नुकसान झालें आहे. माझा व त्यांचा जो जिव्हाळ्याचा संबंध होता त्यामुळें माझी हानि त्यांच्या कुटुंबियांच्याइतकी नसली तरी त्यांचासारखीच अनन्यसाधारण वाटत आहे.

या नाटकांतील कांहीं पद्यें खुद्द कै. गडकर्‍यांच्या सरस लेखणींतून उतरली आहेत हें वर आलेंच आहे. तीं त्यांच्या रसाळ रचनेवरून रसिकांच्या ताबडतोब लक्षांत येतील. तीं वरवर पाहणारांच्याहि नजरेस यावीं म्हणून त्यांच्या शिरोभागीं फुल्या केलेल्या आहेत.

मीं करावयाच्या पदांचीं स्थानें व चाली कै. गडकर्‍यांनीं बलवंत संगीत नाटक मंडळींतील गानकुशल नटांच्या सल्ल्यानें मुक्रर केल्याच होत्या. तीं पदें भाषेच्या व कल्पनांच्या दृष्टीने कोणत्या स्वरूपाची असावीं, याचे स्थूल दिग्दर्शनहि कै. गडकर्‍यांनीं पुणें येथील भेटींत केलें होतें. त्यास अनुसरून बाकीचीं पदें रचण्याचा मीं प्रयत्‍न केला आहे. तो प्रयत्‍न कांहीं स्थलीं विफल झाला असल्याचा संभव आहे. शिवाय मीं केलेल्या पदांतील बहुतेक सार्‍या कल्पना माझ्या स्वतःच्या असल्यामुळे त्यांत नाटक कर्त्याचे हृद्गत उतरावें तितकें उतरलें नसल्याचाहि संभव आहे. माझ्या पदांत जे दोष आढळतील त्याबद्दल रसिकांनी माझ्या हेतूकडे लक्ष देऊन मला क्षमा करावी अशी विनंती आहे. पदांतील कल्पना गद्यांतील कल्पनांहून बहुधा भिन्‍न असल्यामुळें बहुतेक सर्व गद्य अविकृत स्थितींत ठेवितां आलें आहे. दोनचार स्थळीं जरूर वाटल्यावरून एखादें वाक्य, शब्द किंवा शब्द-समूह अधिक घातला आहे, व क्वचित् स्थळीं एखादा शब्द गाळला किंवा बदलला आहे.

या नाटकाची प्रस्तावना ज्या गृहस्थांनीं लिहावी अशी कै. गडकर्‍यांची इच्छा होती त्यांस कांहीं कारणामुळे ती पूर्ण करितां आली नाहीं. यामुळे और्ध्वदेहिक क्रियेइतकेंच दुःखद पण आवश्यक असें हें प्रस्तावनालेखनाचें कर्तव्य मलाच करावें लागत आहे. सुदैवाने नाट्यकर्त्यांच्या असामान्य लोकप्रियतेमुळें तें काम अत्यंत सुलभ झालें आहे.

नवीन पद्यांच्या व प्रस्तावनेच्या लेखकाचें नांव गुप्त ठेवण्याचा प्रथम विचार होता. पण नाटकाची जाहिरात देणार्‍या एका पुस्तकविक्रेत्यानें तें नांव प्रसिद्ध करण्याची घाई केल्यामुळें तो विचारहि बाजूस ठेवावा लागला.
येथपर्यंत पद्यांची व प्रस्तावनेची प्रस्तावना झाली.

नाटकांतील संपूर्ण गद्यभाग खुद्द कै. गडकर्‍यांच्या लेखणीतून उतरला असल्यामुळें त्यांच्या इतर नाटकांतील गुण त्यांतहि उतरले आहेत. नाटक लिहिण्यास सुरुवात त्यांच्या मृत्यूच्या सुमारें एक वर्षापूर्वी होऊन त्याचे जवळ जवळ चार अंक व पांचव्या अंकाचा पहिला प्रवेश येवढा भाग सुरवातीपासून सव्वा महिन्यांतच पूर्ण झाला. त्या वेळीं त्यांच्या शरीरांत क्षयानें प्रवेश जरी केला होता तरी विशेष निःशक्तता उत्पन्‍न केली नव्हती. यामुळें तो भाग त्यांच्या इतर नाटकांतील गद्यभागाच्या तोडीचा उतरलेला दिसून येईल; किंबहुना त्यांत कल्पनांचा व भाषेचा सरसपणा व नावीन्य रसिकांच्या बुद्धीस एकामागून एक चमत्कृतिरूप आघात देऊन तिला अंकित करण्याचें सामर्थ्य, विविध प्रसंगांस व भिन्‍न भिन्‍न पात्रांस कथानकाशीं एकरूप करण्याचें कौशल्य पात्रांच्या व प्रेक्षकांच्या स्वभावांशीं असलेला हृढ परिचय, रसिकांच्या हृदयांत व मुद्रांवर लागोपाठ अनुक्रमें शोकरसाच्या व हास्यप्रकाशाच्या लहरी उठविण्याची शक्ति, इत्यादि जे अनेक गुण प्रतिभावान् कवि व यशस्वी नाटककार या नात्यांनीं कै. गडकर्‍यांच्या ठायीं वसत होते ते प्रस्तुत नाटकांत त्यांच्या इतर नाटकांतल्यापेक्षांहि अधिक प्रमाणांत व उज्ज्वल स्वरूपांत निदर्शनास येतील.

नाटकांतील शेवटचा प्रवेश इतर भागांच्या मानानें योग्यतेंत कांहींसा कमी भरेल. नाटकांतील अत्यंत सुंदर अशा पहिल्या प्रवेशाच्या मानानें तर तो फारच फिक्का वाटेल, पण कर्त्याच्या या अखेरच्या नाटकांतील तो अखेरचा प्रवेश कर्त्याच्या आयुष्यांतील अखेरच्या दिवशीं व अखेरच्या प्रहरांत लिहिला गेला, या एका गोष्टीमुळें त्या प्रवेशास व त्याबरोबर संपूर्ण नाटकास कर्त्याच्या नाटकांतच नव्हे, तर एकंदर मराठी किंबहुना जगाच्या वाङ्मयांत अपूर्व महत्त्व आलें आहे. नाटकाचा व कर्त्याचा शेवट बरोबरच झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. एका घटकेस नाटकाचें जनन व दुसर्‍या घटकेस कर्त्याचें मरण घडून आलें. नाटकाचा प्रवेश रंगभूमीच्या जगांत होतो न होतो तोंच जगाच्या रंगभूमीवरून कर्त्याचें निष्क्रमण झालें. अपत्याला आयुर्दान करून चिरंजीव करणार्‍या बाबर बादशहाप्रमाणें कर्त्यानें आपल्या कृतींत जीवन ओतलें. ती कृतीहि स्वतः जरा पत्करून पित्यास तरुण करणाच्या पुरुराजाप्रमाणें स्वतः वैगुण्य स्वीकारून व पित्याचा कीर्तिरूप देह सतेज करून पितृऋण फेडील अशी खात्री आहे. लढता लढतां धारातीर्थी पतन पावण्याचें भाग्य अनेक वीरांच्या ललाटीं असतें परंतु लिहितां लिहितां मृत्युमुखीं पडण्याचें व विधिलेखाबरोबरच स्वतःचा लेख संपविण्याचें सद्‍भाग्य फारच थोड्या ग्रंथकारांच्या वांट्यास येत असेल ! 'भावबंधन' नाटक त्यांतील विपुल हास्यरसानें हजारों प्रेक्षकांस हंसवून त्यांच्या मुरकुंड्या वळवील, पण त्याबरोबरच त्यांस आपल्या जनकाच्या निधनाची उद्वेगजनक आठवण देऊन क्षणभर तरी तटस्थ केल्याशिवाय राहणार नाहीं. रसिकांच्या शोकरसास हास्यरसास एकसमयावच्छेदेंकरून भरती आणून त्यांच्या दुःखाश्रूंचा संगम घडविणारें हें नाटक गंगायमुनांचा संगम घडविणार्‍या प्रयागतीर्थाइतकेंच पवित्र आहे.

हें नाटक कै. गडकर्‍यांनीं मुद्दाम बलवंत नाटक मंडळीकरितां लिहिलें, त्या मंडळींवर त्यांचें किती प्रेम होतें हें त्यांनीं तिच्या ऋणांतून उत्तीर्ण होण्याकरिता आपले प्राण खर्ची घातले या एकाच गोष्टीवरून उघड होईल. मंडळीस त्यांच्या प्रतिभेचा अधिक लाभ झाला नाहीं, हे दुर्दैव होय.

प्रस्तुत नाटकाच्या मुद्रणाकरितां छापखान्याकडे त्यांच्या रंगावृत्तीची प्रत पाठविण्यांत आली होती. त्या प्रतीचें कै. गडकर्‍यांच्या मूळ प्रतीहून जे अंतर दिसून आलें तें पुरवणींत दिलें आहे. रंगावृत्तीची प्रत मूळ प्रतीशीं ताडितांना मला माझे व्यवसायबंधु व स्‍नेही रा. प्रभाकर गणेश धोपेश्वर व रा. केशव काशीनाथ जोशी यांचें जें अमोल साहाय्य झालें त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

या नाटकावरून कर्त्याचा एकदां हात फिरला असता तर तें झालें आहे त्यापेक्षांहि सरस वठलें असतें. नाटक छापत असतांहि त्यावरून त्याच्या जनकाची प्रेमळ नजर फिरणें इष्ट असतें. पण जन्मापासुनच जे अपत्य पितृ- प्रेमास आंचवलें त्याची पितृव्यादिकांनी कितीहि प्रेमानें जोपासना केली तरी त्याची आबाळ व्हावयाची चुकत नाहीं. त्यांतील कांहीजण त्याच्या खाण्यापिण्याची तरतूद करितात तर दुसरे कांहींजण त्यास वस्त्रप्रावरणें पुरवितात व तिसरेच कांहीजण त्याचें लालन करितात. प्रेमानेंच का होईना, एकजण त्यास शक्ति आणण्याकरितां अजीर्ण होईपर्यंत खाऊं घालतो तर दुसरा त्याची प्रकृति निकोप राहावी म्हणून त्याची जवळ जवळ उपासमार करितो. एकजण त्याला शुद्ध हवेचा लाभ मिळावा म्हणून उन्हातान्हांतून हिंडवितो तर दुसरा त्याजवर उबदार वस्त्रें लादून त्याचा कोंडमारा करतो. असाच कांहींसा प्रकार कै. गडकर्‍यांच्या या कृतीचा झाला आहे.
नाटकाची मूळ प्रत, तिजवरून रंगभूमीकरितां तयार झालेली प्रत, तिजवरून छापखान्याकरितां तयार झालेली नक्कल, खिळे जुळविणारांनीं केलेली ही नकलेची नक्कल, स्थूल मुद्रितें अनेकांच्या हातून जातांना त्यांत त्यांनीं केलेला फेरफार या सर्वांचे छापील प्रतीवर बहुविध संस्कार झाल्याकारणानें तिच्यांत शब्दाअक्षरांसंबंधानें प्रमादबाहुल्य आणि शुद्धलेखनासंबंधानें व विरामांसंबंधानें बरेंच मतवैचित्र्य आढळून येईल.
तथापि कै. गडकरी हयात असते तरीहि त्यांना ही कृतिकन्या अखेरीस ज्या कनवाळू रसिकवृंदरूपी पतीच्या स्वाधीन करावी लागली असती- त्याच्या औदार्यावर भिस्त ठेवून, त्यानें तिला जनकनिर्विशेष प्रेमानें वागवावें अशी विनंती करून, ती त्याच्याच चरणीं अर्पण करतों.
(संपादित)

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
दि. १५ ऑगस्‍ट १९२०
'भावबंधन' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गो. य. राणे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.