A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय भारता जय भारता

जय भारता ! जय भारता !
जय भारती जनदेवता !

जय लोकनायक थोर ते
जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते
जय आमुची स्वाधीनता !

तेजोनिधी हे भास्करा,
प्रिय पर्वता, प्रिय सागरा,
तरूवृंदहो, हे अंबरा,
परते पहा परतंत्रता !

बलिदान जें रणिं जाहलें
यज्ञांत जें धन अर्पिलें
शतकांत जें हृदयीं फुले
उदयाचलीं हो सांगता !

ध्वज नीलमंडल हो उभा
गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा
दलितांस हा नित्‌ तारता !
गीत - कुसुमाग्रज
संगीत - कनू घोष
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४७.
उदयाचल - ज्याच्या आडून चंद्रसूर्याचा उदय झालेला दिसतो तो पर्वत.
भास्कर - सूर्य.
वितरणे - देणे.
सांगता - पूर्णता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.