A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जन्मभू जय पुण्यभू

जय जन्मभू! जय पुण्यभू! जय स्वर्गभू सुखदायिनी!
जय धर्मभू! जय कर्मभू! जय वीरभू जयशालिनी!

उधळून प्राणांची फुले
महाराष्ट्र तुज मुजरा करी!
वाहून तनमनधन तुला
पंजाब चरणांना धरी;
गाई यशोगीते तुझी
वंगीय अमृतवैखरी;
गंगेचिया लाटांतुनी उठती तुझे नामध्वनी!

गुजरातच्या नेत्री तुझी
धावून येती आसवे;
बघ, हृदय आंध्राचे जळे
जननी तुझ्या हृदयासवे;
रक्तास राजस्थानच्या
तुजहून दूर न राहवे;
तामीळनाडाच्या उरी आला उमाळा दाटुनी!

कर्नाट, केरळ, ओरिसा-
सारेच छावे जागती;
आसामच्या गिरिकंदरी
वणवे मनांचे हिंडती;
काश्मीरच्या छातीतुनी
जखमा तुझ्या बघ वाहती!
जय कोटिजनगणमानिनी! जय सकलमानसमोहिनी!

तू सुप्त स्वर कंठातले,
तू श्वास माझा एकला,
तू स्पंदने हृदयांतली,
तू रक्तिमा रक्तांतला;
नाही बरे माझा तुझा-
जननी जिव्हाळा संपला!
साध्यासुध्या शब्दांत ह्या तू ओतिली मंदाकिनी!
कंदरा - दरी / गुहा.
गिरी - पर्वत, डोंगर.
भू - पृथ्वी / जमीन.
मंदाकिनी - भागिरथी / स्वर्गातली नदी.
वैखरी - वाणी, भाषा.

 

Random song suggestion
  शरद जांभेकर, आकाशवाणी गायकवृंद