माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का?
मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का?
हा खेळ घटकेचा तुझा घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का?
माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले तुजला कधी उमगेल का?
गीत | - | वसंत अवसरे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | अवघाचि संसार |
राग | - | चंद्रकंस |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
सुगम संगीताचा ऐन भरीचा सुवर्णकाळ होता तो; त्यामुळे गाण्यांना मिळणारी प्रशंसात्मक विशेषणे ही एक औपचारीकताच होती. तरीसुद्धा काही गाण्यांना काही विशेष शैक्षणिक परंतु मजेदार गोष्टींची किनार होती. अशातलंच एक गाणं होतं, 'जे वेड मजला लागले..'. या गाण्याच्या श्रेयनामावलीत संगीतकार वसंत पवार, गायक सुधीर फडके – आशा भोसले आणि पडद्यावर दिसणारे नायक–नायिका राजा गोसावी–जयश्री गडकर अशी परिचित नावं होती आणि त्याबरोबर एक वेगळं नाव होतं ते या गाण्याच्या गीतकाराचं, वसंत अवसरे !
या नावावरच आपली आजची 'गोष्ट गाण्याची' आधारित आहे.
'जे वेड मजला लागले' हे गीत खरं म्हणजे कवयित्री शान्ता शेळके यांनीच लिहिलेले आहे. मग गीतकार म्हणून वसंत अवसरे यांचं नाव कसं?
वसंत अवसरे यांचं नाव देणं हा एक त्यावेळच्या संभाव्य समस्येवर प्रासंगिक तोडगा होता. समस्या गंभीर नव्हती पण एक खबरदारी म्हणून हा उपाय योजला गेला. शान्ता शेळके या त्या काळात महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरी करत होत्या. त्याचबरोबर त्या मराठी चित्रपटाच्या सेन्सॉरबोर्डाच्या सदस्यही होत्या. चित्रपटपरीक्षणाचं रीतसर मानधनही त्यांना मिळायचं. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या गीतलेखनाचं काम करून त्याचं अधिकृतरीत्या मानधनही घेणं, हे कायद्याच्या आड येऊ नये यासाठी एक खबरदारी म्हणून त्यांनी एखाद्या वेगळ्या नावाने गीतलेखन करावं, असा मार्ग सेन्सॉर बोर्डाचे एक अधिकारी श्री. भट यांनी शोधून काढला. शान्ता शेळके यांचे एक जवळचे स्नेही डॉ. वसंत अवसरे यांच्या नावाने त्यांनी हे गीतलेखनाचं काम करायचं ठरलं. त्यामुळे शान्ता शेळके यांनी लिहिलेल्या, 'अवघाचि संसार' मधल्या गाण्यांच्या श्रेयनामावलीत डॉ. वसंत अवसरे यांचं नाव आलं. सर्वात प्रथम ही गोष्ट मला एका कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांच्या निवेदनातून कळली आणि थोडी सविस्तर माहिती इसाक मुजावर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात माझ्या वाचण्यात आली.
'हा खेळ घटकेचा तुझा घायाळ मी पण जाहलो' असे नाजूक परंतु घायाळ करणारे शब्द, वसंत पवारांची मधात घोळलेली गोड, गेय चाल आणि बाबुजी आणि आशाताई यांचे स्वर्गीय आवाज; अजून काय पाहिजे !
या गाण्यात आशा भोसलेंना एक आलाप आणि धृवपद एवढंच गायला दिलं आहे पण त्यांनी ते इतकं लडिवाळ गायलेलं आहे की बस ! हे आणि 'रूपास भाळलो मी' ही दोन्ही गाणी उंच सुरांत आहेत; म्हणजे गायकाला नाही पण गायिकेला तो सूर नक्कीच उंच आहे. पण आशा भोसलेंनी ते आव्हान समर्थपणे पेललं आहे.
संगीत संयोजकाची कल्पकताही बघा. 'जे वेड मजला..' मध्ये भारतीय तबल्याच्या जोडीने बोन्गोचा वापर, तर 'रूपास भाळलो मी' मधे चक्क ढोलकीचा सुंदर वापर केला गेला आहे. या छोटयाछोटया गोष्टींनी गाण्याला वेगळं परिमाण प्राप्त होत असतं. यात संगीतकाराची, संगीत संयोजकाची कल्पकता, बुद्धीमत्ता दिसते. अशाच प्रकारचा ढोलकीचा वापर शंकर–जयकिशन यांनी 'आवारा ड्रीम सॉंग' मधे तर सलील चौधरींनी 'आजारे परदेसी..' मधे करून रसिकांना जिंकलं.
'जे वेड मजला'चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राजा गोसावी–जयश्री गडकर यांचा लाजवाब अभिनय. सांगितिक उंचीच्या तोडीस तोड असा प्रसन्न अभिनय या जोडीने साकारला आहे.
शान्ता शेळके यांच्या सारख्या विदुषी मराठी सुगम संगीताला लाभल्या हे खरंच आपलं महत्भाग्यच आहे. 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' 'तोच चंद्रमा नभात' 'मी डोलकर' 'हा माझा मार्ग एकला' 'ही चाल तुरुतुरु' 'सोनसकाळी सर्जा सजला' 'मराठी पाऊल पडते पुढे' 'जय शारदे वागीश्वरी' सारखी अजरामर गाणी आपल्याला त्यांच्यामुळेच ऐकायला मिळाली. एवढी प्रतिभा, एवढं यश मिळूनही शान्ताबाई कायम साध्याच राहिल्या आणि अगदी शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. जुन्या पिढीतल्या महान संगीतकारांनी त्यांची गाणी अजरामर केलीच पण नव्या पिढीतल्याही संगीतकारांना त्यांच्या मागणीप्रमाणे शान्ताबाई हरप्रकारची गाणी लिहून द्यायला नेहेमीच उत्साहानी तयार असत. मराठी आणि संस्कृतमधे एम. ए. केलेल्या या महान कवयित्रीने प्राध्यापिका, पत्रकार, सेन्सॉरबोर्ड सदस्य अशा चौफेर कामगिरीबरोबरच मराठी काव्यप्रांतातल्या केलेल्या अजोड कामगिरीबद्दल आपण सुगम संगीत रसिक त्यांचे आजन्म ऋणी राहू !
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.