A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेथें राघव तेथें सीता

निरोप माझा कसला घेतां
जेथें राघव तेथें सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता !

संगें असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्‍न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां

वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांचे मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटीं
त्या चरणांचा विरह शेवटीं -
काय दिव्य हें मला सांगतां?

कोणासाठीं सदनीं राहूं?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊं?
कां भरतावर छत्रें पाहूं?
दास्य करूं का कारण नसतां?

कां कैकयि वर मिळवी तिसरा?
कां अपुल्याही मनी मंथरा?
कां छळितां मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजितां?

विजनवास या आहे दैवीं
ठाउक होतें मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावें प्रीति लाभतां

तोडा आपण, मी न तोडितें
शत जन्मांचें अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचें अखंड पूजन
हें आर्यांचें नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणितां?

मूक राहतां कां हो आतां?
कितिदा ठेवूं चरणीं माथा?
असेन चुकलें कुठें बोलतां
क्षमा करावी जानकिनाथा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मधुवंती
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २२/७/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.
अंतराय - विघ्‍न, अडथळा.
आर्या - श्रेष्ठ स्‍त्री.
कानन - अरण्य, जंगल.
चाप - धनुष्य.
जाया - पत्‍नी.
भाता - बाण ठेवण्याची पिशवी.
मंथरा - कुटिल स्‍त्री, कुबड असलेली कैकयीची दासी. हिने कैकयीचे मन कलुषित केले होते.
विजन - ओसाड, निर्जन.
श्वापद - जनावर.
शैशव - बाल्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण