A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाले ग बाई संसाराचे हसे

मिटून घेतले नेत्र तरी ते चित्र मनाला दिसे
झाले ग बाई संसाराचे हसे

मी वाट पाहते बसुनी तुमची घरी
तुम्ही रात जागता भलतीच्या मंदिरी
पडणेच कपाळी चुकल्यावर पायरी
तोल सोडुनी तुम्ही वागता, तुम्हा सावरू कसे?
झाले ग बाई संसाराचे हसे

कुणी म्हणे तुम्हाला शुद्धच नसते कधी
तीजसवे जेवता एका ताटामधी
कोठून शोधु या रोगावर औषधी
जीभा जगाच्या कानी ओतती जसे तापले शिसे
झाले ग बाई संसाराचे हसे

भाळला नाथ हो सौख्याला कोणच्या
तुम्ही मांजर झाला ताटाखाली तीच्या
संपल्या कथा आता नीतीच्या प्रीतीच्या
नीतीहीनाची अनाथ बाईल, कोण तीयेला पुसे
झाले ग बाई संसाराचे हसे
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- ललिता फडके
चित्रपट - उमज पडेल तर
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.