A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झिणिझिणि वाजे बीन

झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधिं अर्थाविण सुभग तराणा
कधिं मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधिं केविलवाणा
शरणागत अतिलीन

कधिं खटका, कधिं रुसवा लटका
छेडी कधिं प्राणांतिक घटका
कधिं जिवाचा तोडुन लचका
घेतें फिरत कठीण

सौभाग्यें या सुरांत तारा
त्यांतुन अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणांत प्रवीण
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - श्रीधर फडके
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ७ मार्च १९४३.
अनुदिन - दररोज.
अलख - अदृष्य.
निरंजन - निर्गुण ब्रह्म.
फिरत - तानप्रकार.
बीन - एक तंतुवाद्य.
सुभग - दैवी / सुंदर.
श्रीधर फडके यांची गोड, अर्थवाही चाल आणि गाताना आशाबाईंनी त्या चालीचं सोनं केलेलं..
झिणिझिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

'चैत्रपुनव' हा बोरकरांचा संग्रह ३०-३५ वर्षांपूर्वी वाचला खरा; पण त्यातल्या या कवितेची झिणझिण मनात आणखी खोल उमटली ती तिचं गाणं झालेलं ऐकताना. खरंतर बोरकरांची सगळी कविताच अशी आहे; वाचणार्‍याच्या मनात सारखी झिणझिणत राहणारी. एक धुंदी आहे तिच्यात. एक भारलेपण आहे. कविता म्हणजे मंत्रच आहे, असतो, अशा विश्वासानं लिहीत राहिले होते बोरकर. त्यांचा तो विश्वास त्यांच्या कवितेनं सार्थ ठरवला आहे.

अगदी लहानपणापासून बोरकरांना रंगांचं वेड होतं, स्वरांचं वेड होतं आणि शब्दांचं वेड होतं. अष्टौप्रहर गाण्यानं गजबजलेल्या त्यांच्या भोवतालच्या परिसरातून त्यांच्याकडे कविता चालत आली ती तालासुरातच आली. तेव्हापासून सर्जनाची वीणा मनात अखंड वाजत राहिली.
बोरकरांची ही कविता त्या वीणावादनाचीच कविता आहे. गीत आणि कविता यांच्या सीमेवर झुलणारी कविता. साधेच आहेत शब्द. नेहमीच्या ओळखीचे. प्रथम समोर येणारा त्यांच्यामधला अनुभवही वरवर पाहता साधाच आहे. पण हळूहळू कवितेचा नाद आणखी खोल उमटत राहतो आहे. दोन शब्दांच्या मधल्या जागांवर वेगळा अर्थ नादावलेला कळतो आहे. नवीन काही आत आत झिणझिणत राहतं आहे.
चांगल्या कवितेत असं नेहमी घडतं. चांगल्या गीतातही ते घडताना इथे कळत आहे आणि जे कळतं आहे, ते कळलं तरी कळवता, समजावता येऊ नये, इतकं अवघड आहे. तरल आहे. सहज आहे.

आसक्ती आणि विरक्ती अशा दोन्ही धाग्यांची बोरकरी कवितेची वीण मोठी नवलाची आहे. 'रसलंपट मी, तरि मज अवचित गोसावीपण भेटे' या त्यांच्या प्रचितीतून ती आली आहे. एकीकडे नेहमीचा बीन वाजवण्याचा सरळ साधा लौकिक अनुभव आहे आणि त्यातून ऐकू येणारा जीवनचैतन्याचा एका वेगळ्याच अलौकिक नादाचा अनुभव आहे.

बीन म्हणजे बीना- वीणाच. दोन भोपळे असलेलं हे वाद्य. असं म्हणतात, की हा भोपळा तयार करण्याचं लाकूड हे ज्या विशिष्ट प्रकारच्या वेलाचं असतं, तो वेल जर धबधब्याच्या काठी वाढलेला असेल तर वाद्य फार सुंदर वाजतं. जलप्रपाताचा तो महाओंकार ज्या लाकडाच्या रोमारोमात भरून राहिला आहे, त्याच्यापासून बनलेलं वाद्य दैवी स्वर उमटवत असेल यात नवल नाही.

या वाद्यावर दरवेळी वेगळी चीज वाजते आहे. नुसती वेगळी नाही. नवी. 'अनुदिन चीज नवीन'
कधि अर्थाविण सुभग तराणा
कधि मंत्राचा भास दिवाणा
सूर सुना कधि केविलवाणा
शरणागत अतिलीन

या वाद्यावर कधी नुसता तराणा वाजतो. नुसते बोल. त्यांना विशिष्ट अर्थ नाही. अर्थाशिवायचा तराणा, पण तो सुभग आहे. नव्हे, तो अर्थाशिवाय आहे, म्हणूनच सुभग आहे. म्हणजे सुंदर आहे आणि भाग्यवानही आहे. 'सुभग' शब्दाचे दोन्ही अर्थ त्या तराण्याला कसे अलगद उचलून घेतात ! अर्थाशिवायचा तराणा भाग्यवान कसा असू शकेल आणि सुंदरही कसा असेल तो?

क्षणभर गोंधळतानाच आपल्या लक्षात येतं की शब्द अर्थवान असतो, म्हणून तर तो स्वराइतका श्रेष्ठ नसतो. शुद्ध नसतो. अर्थ बांधणारा असतो. मर्यादित करणारा असतो. जे निर्गुण, निराकार आहे ते असीम आणि अरुप आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अथांग, अमर्याद असा स्वरच हवा. नितळ, शुद्ध असा स्वर ! शब्दार्थाचा बंध नसलेलं संगीत अधिक सुंदर असतं ते यासाठी. ते भाग्यवान असतं तेही याचसाठी.

बोरकरांचं इथलं प्रत्येक विशेषण एका मर्मज्ञ रसिकाचं विशेषण आहे. या वाद्यावरचा मंत्रभासही दिवाणा आहे, असं ते म्हणतात. मुळात 'मंत्र' म्हणत नाहीत ते; मंत्राचा भास म्हणतात. वाटेल ते घडवण्याची अमर्याद शक्ती सामावणा मंत्र नाही उमटत या वाद्यातून, पण तशा मंत्राचा भास घडवणारं संगीत उमटतं. तो भास दिवाणाच असतो. खुळाच असतो; पण शेवटी तो मंत्राचा भास असतो हे विसरता कामा नये. त्या एका दिव्य शक्तीचा भासही भाग्याचाच की. मूळ मंत्र उमटण्यासाठी वाद्यही तेवढं सक्षम हवं. या मृण्मय जीवनाची तेवढी क्षमता कुठली? म्हणून मग अशा कधीतरी होणार्‍या दिव्य भासांनी दिवाणं व्हायचं आणि कधी केविलवाण्या सुनेपणाचा शापही भोगायचा.

तसं सुनेपण भोगताना एक मात्र होतं; स्वत:च्या अपुरेपणाचं, क्षुद्रपणाचं, मर्यादांचं लख्ख भान येतं आणि विराटासमोर, असीमासमोर, आकलनापलीकडच्या त्या एका दिव्य शक्तीसमोर शरण जाण्याइतक्या लीनतेचा स्वीकार करता येतो. स्वीकारता येतं ते नाना प्रकारांनी खेळणारं, खेळवणारं बहुरुपी संगीत !
कधि खटका, कधि रुसवा लटका
छेडी कधि प्राणांतिक घटका
कधि जिवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीण

गाण्याचीच आहे परिभाषा. पण हे संगीत साधं वाद्यसंगीत नाही. संगीताबद्दल बोलताबोलता बोरकर त्या संगीताच्या परिणामांबद्दल बोलू लागतात आणि आपल्याला उलगडू लागतं, की हे तर जीवनसंगीत आहे आणि सृष्टीतलं सृजनसंगीतही आहे.
रोमांचांतून कधि दीपोत्सव
कधि नेत्रांतुन पुष्पांचे स्त्रव
कधि प्राणांतुन सागर तांडव
अमृतसिंचित जीण

हे संगीत ऐकताना आपण उचंबळून येतो. गहिवरतो. कधी खळबळून जातो, कधी सर्वागावर रोमांच उठतात. आतबाहेर कणाकणातून उजळून जातो आपण. श्रेष्ठ संगीत ऐकताना हेच परिणाम आपण श्रोते अनुभवतो ना ! बोरकर म्हणतात ते जीवनसंगीताविषयी बोलतात. सगळं जीवन म्हणजेच परामात्म्याचं एक महासंगीत आहे, अशा भावनेनं ते बोलतात आणि भारतीय तत्त्वचिंतनाच्या अतिशय समृद्ध आणि रसरशीत परंपरेचे कवडसे त्यांच्या शब्दांमधून झळकत राहतात.
सौभाग्ये या सुरात तारा
त्यांतुन अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणात प्रवीण

मला या ओळी वाचताना, ऐकताना नेहमी आठवण होते ती रेव्हरंड टिळकांची आणि तबलानवाज उस्ताद थिरकवाँसाहेबांची. आपल्या कविता म्हणजे कुणा देवदूतीचे स्वर आहेत; ते आपले नव्हेत, असं म्हणणार्‍या रेव्हरंड टिळकांनी हृदयवीणेच्या तारांवर बोटं टेकवत गाणार्‍या त्या देवदूताच्या गाण्याविषयी लिहिलं आहे-
अस्पष्ट गोड गाई ती,
तेच मी पुढे करतो,
मजला कवी का म्हणता?
मृण्मय पात्रात देवरस भरतो

थिरकवाँसाहेब वाजवायचे. भान विसरायचे. वाजवतावाजवता म्हणायचे, 'वाह ! क्या बात है । परवरदिगार बजा रहे है ।' जणू आतला वाजविणारा दिसायचा त्यांना ! दैवी वादक

बोरकर त्याच दैवी वादकाविषयी बोलतात. वाजवणारा तो आहे. अलख निरंजन. आपल्याच मस्तीत गाणार्‍या बोरकरांनी ईश्वर, परमात्मा असे शब्द न वापरता त्या दैवी वादकाला 'अलख निरंजन' म्हणावं हेही किती मार्मिक आहे ! शब्द असतातच नेहमी भाषेत विखुरलेले. जाणता कवी त्यातला अभिलाषितार्थ चिंतामणी तेवढा उचलून घेतो.

अलख हा एक साधना संप्रदाय आहे. सृष्टिरहस्याचा शोध घेणारे योगी म्हणजे अलखिया सांप्रदायिक. निर्गुणी भजनं गाणारे नाथपंथी जोगीही आपल्याला अपरिचित नाहीत. 'अलख निरंजन'चा पुकार कधी आपणही ऐकला आहे. त्या जोग्यांच्या गूढ साधनेची धुंदकारलेली आठवण देतात बोरकर. त्यांच्या लेखी जे रहस्यमय परमतत्त्व आहे, ते जणू आपल्याच मस्तीत सगळ्या जीवनाचा लयताल सांभाळणारं चैतन्याचं संगीत छेडत राहिलेला वादक आहे. परमश्रेष्ठ वादक. ते संगीत आपल्या वाद्यावर उमटतं आहे, आपल्या प्रतिभेतून स्त्रवतं आहे, हे आपलं

तंबोरे सुरात लागणं हीसुद्धा एक विलक्षण साक्षात्काराची गोष्ट असते. आपल्या तारा सुरात लागल्या आहेत, हे आपलं भाग्य. परमभाग्य. म्हणून तर त्यातून लखलखत्या, तरल पार्‍यासारखं संगीत खेळू शकतं आहे. पण संगीत वाद्यातून निर्माण होत असलं तरी वाद्य स्वत: नाही ते निर्माण करू शकत. वाद्य उत्तम आहे, तारा जुळल्या आहेत, सूर लागला आहे, पण वाजवणारा वादकच त्यातून दैवीसंगीत निर्माण करु शकतो.

बोरकरांसाठी त्यांच्या निर्मितीचं संगीत काय किंवा भोवती रसरसलेल्या जीवनाचं संगीत काय; ते निर्माण करणारा आहे तो अलख निरंजन आहे. तोही कसा, तर 'सहजपणात प्रवीण !'

या शब्दांच्या जोडीशी पुन्हापुन्हा थांबतो आपण. काय म्हणतो आहे हा कवी? 'सहजपणात प्रवीण' हे शब्द कसे सुचले असतील या कवीला? सहज हा शब्दही बोरकरांना मिळाला आहे तो परमार्थाच्या परिसरातून. सहजयोग ही एक साधना आहे. सहजिया साधना म्हणून प्रसिद्ध आहे ती. बोरकर तिची आठवण देतात. ती साधना सोपी नव्हे. सहजपण हीच मुळात फार फार कठीण गोष्ट आहे. अनेक अवघड गोष्टी साध्य करू शकतो माणूस. अनेक कठीण कलांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. अवघड आहे ते सहजपणात प्रावीण्य मिळवणं. सहज साधेपण हा तर माणसाचा स्थायीभाव असायला हवा. जसे मुळात असतो, जसे जन्मतो, तसं असणं. तितकं स्वाभाविक असणं. तितकं निखळ- नितळ असणं. तितकं निरागस- शुद्ध असणं. तसं असणं ही एक कला आहे आणि ती फार अवघड कला आहे. आपल्या मुळाशी पोचावं लागतं त्यासाठी. बोरकरांनीच तसा अनुभव आणखी एका कवितेत सांगितला आहे-
गंगेत मी काल सचैल न्हालो
माझ्या मनाच्याच तळामुळाशी
श्रीपद्मसा गंधसगर्भ आलो
माझ्याच प्रज्ञाप्रभवप्रकाशी

मला या सगळ्या कवितेचा प्राणच बोरकरांच्या त्या अखेरच्या दोन ओळींत स्पंद पावताना जाणवतो-
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणात प्रवीण
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन
(संपादित)

अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (प्रकाशन दिनांक अनुपलब्ध.)
(Referenced page was accessed on 9 April 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.