A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जिवलगा कधी रे येशील तू

दिवसामागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा, कधी रे येशील तू?

धरेस भिजवून गेल्या धारा
फुलुन जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीसी जोडून गेले सप्तरंग सेतू

शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले अंतरीचे हेतू !

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !

पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली
मेघावली नभी पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
केतु - ध्वज / पताका.
काहिली - उकाडा / आग / तळमळ.
नुरणे - न उरणे.