बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
निळ्या डोळ्यांवरी
मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
श्रावणाच्या सरी
पानभर थर्थरी
हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ देवकी पंडित ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, ऋतू बरवा |
जब्बार पटेलांचा लावणीचा अभ्यास खूप आहे. त्यात मला शक्य तेवढ्या नवीन बांधणीच्या, नव्या बाजाच्या लावण्या मी दाखवल्या.
अनेक बैठकीच्या लावण्या. मधु कांबीकरचं बैठकीच्या लावणीचं नृत्य आजही बघावं. भाईंनी या लावण्यांची खास अदाकारी समजून देण्यासाठी वाईस यमुनाबाईंना बोलवून घेतले. आम्ही सगळ्यांनी हनुमान थिएटर्समध्ये एकत्र जलसा केला. यमुनाबाईंनी बैठकीच्या लावण्या वयाच्या ऐंशीमध्ये पेश केल्या. नृत्यांगना लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांनी अगदी बारीकसारीक नृत्याचे धडे मधु कांबीकरला दिले.
हनुमान थिएटरमध्ये पु. ल., सुनीताबाई, जब्बार.. आम्ही सगळेच रसिक. आम्ही ते भरभरून पाहिलं, ऐकवलं.
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
गाणं ऐकल्यावर सुनीताबाईंनी सांगितलं, "मोर निळा असतो, तुम्ही हिरवा लिहिला. मांडणी छान पण मला वाटतं गाताना एकदा हिरवा, एकदा निळा असावं."
अशी सगळी मजा. मला किती भरभरून मिळालं.
(संपादित)
ना. धों. महानोर
'कवितेतून गाण्याकडे' या ना. धों. महानोर लिखित पुस्तकातून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.