A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय सामना करू तुझ्याशी

अग, काय सामना करू तुझ्याशी नारीजात तू दुबळी ग
हुकूम पाळिता पुरुषजातिचा सरे जिंदगी सगळी ग
बाळपणी तुज धाक पित्याचा, तरुणपणी तुला हवा पती
वृद्धपणा तव पुत्राहाती स्वतंत्र बुद्धी तुला किती?

अरे नको वाढवण सांगू शाहिरा पुरुषजातीचे फुकाफुकी
स्‍त्रीजातीच्या अकलेपुढती तुझी बढाई पडंल फिकी
सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला धडा
असेल ठावी कथा जरी ती, बोल मज पुढे धडाधडा !

अग तूच सांग ग, कोणासाठी सावित्री ते दिव्य करी
सावित्रीची कथा सांगते पुरुषप्रीतिची मातबरी !
पतीवाचुनी कसे जगावे हाच तियेला प्रश्न पडे
इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ की, चतूर सारिके बोल पुढे !

पुरुषावाचून जन्मे नारी या पृथ्वीचा कोण पती?
पित्यावाचुनी जन्मा आली काय थांबली तिची गती?

अग अज्ञानाने नकोस बोलू आभाळाची सुता धरा
गती कशाची, सूर्याभोवती फिरे नार ती गरागरा !
पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्म तिचा
वृक्षावाचुनी जन्म पांगळा फुलारणार्‍या वेलीचा !

अरे सांग शाहीरा, नारीवाचुन पुरुषहि झाला कधी पुरा?
पुराण-शास्‍त्रीं धुंडून पाही, धुंड गगन की वसुंधरा
तार्‍यामाजी शुक्र नांदतो, वार्‍यापाठी उभी हवा
पृथ्वीभंवती चंद्र फिरतसे वेष घेउनी नवा नवा !

हवा कशाला कलह सांग हा आपसांतला खुळ्यापरी
हारजितीची हौसच खोटी, तुझी नि माझी बरोबरी
सुता - कन्या.

 

Print option will come back soon