A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मुंबईची लावणी

मुंबई नगरी बडी बाका । जशी रावणाची दुसरी लंका । वाजतो डंका ।
डंका चहू मुलकी- राहण्याला गुलाबाची फुलकी । पाहिली मुंबई ।

मुंबई नगरी सदा तरणी । व्यापार चाले मनभरूनी दर्याच्या वरूनी ।
वरुनी जहाजे फिरती- आगबोटीत निराळी धरती । पाहिली मुंबई ।

बोरीबंदर कोटकिल्ला कापाच्या मैदानातला । कमिटीचा बंगला देतो भेटीसरशी ।
ताजमहाल पॅलेस हाटेल । तिथेच तुला भेटेल । त्याची इच्छभोजन मेजवानी मजेदारशी ।

सेक्रेटरी हॉल । तुला काळा घोडा बहाल । कुलाब्याच्या दांडीबागची हवा थंड गारशी ।
ट्रामगाड्या मोटारगाड्या । हजार देतो खटार गाड्या । व्हिक्टोरिया नव्या गाड्या रंगदारशी ।

लगबग भारी । चाले गोंधळ सारा । रस्त्यात मधे मोटारीची शिंग वाजे हितं गर्दी ।

परळापासून सरळ रस्ता । भायखळ्याच्या पुलावरचा । तिथून पुढे खालचा लागंल उभा पारशी ।
जमशेदजी बाटलीवाला । याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिना वारशी ।

बटाट्याची चाळ । तू कायम सांभाळ । तिथं बांधुनिया चाळ । मग ताल धरशी ।
पवळे जपून चाल । घाईघाईत होतिल हाल । धर हात सावरी तोल ।
हा पठ्ठे बापूचा बोल । अगं ही मुंबई । पाहिली मुंबई ।
कोट - तट, मजबूत भिंत.

मुंबईची लावणी

मुंबई नगरी बडी बाका । जशी रावणाची दुसरी लंका । वाजतो डंका ।
डंका चहु मुलकी । राह्याला गुलाबाचे फुलकी पाहिली मुंबई ॥१॥

मुंबई नगरी सदा तरणी । व्यापार चाले मन भरूनी दर्याच्या वरूनी ।
वरूनी झाजे फिरती । आगबोटीची निराळी धरती ॥२॥

मुंबई नगरी गुलहौशी । आल्यागेल्याची खरी काशी । नित्य नवी फांशी ।
फासाला कैदी चढतो । टांकसाळत पैसा झडतो ॥३॥

मुंबईशहरी नाकेबंदी । बारा कोसाची लांबीरुंदी । सैनाशिव बंदी ।
शिवबंदी बोट जाती । विलायताची खबर घेऊन येती ॥४॥

मुंबईनगरी दर्यांवरती । तिथं सारी मवाल्यांची गर्दी ।
असल खरा दर्दी । दर्दी ओढील पैका । नाही तर पोटाची शंका ॥५॥

ह्या मुंबईची तन्हा न्यारी । नाक्यावर पोलीसांची फेरी ।
करितो वारावारी । वारावारी दिनराती । गाडीत कैक खून होती ॥६॥

पाहिली मुंबई सखे बाई । सवाई इंग्रजी बादशाही । कवी चतुराई ।
चतुराई शिंदेशाही । पठ्ठे बापूराव कवि गुणगाई ॥७॥

(चाल) शिवू नको मुका दे दुरून । देतो मुंबई खरेदी करून ॥८॥

(चाल) हे ग मुंबई बंदर । सगळ्या दुनियेत सुंदर ।
छानदार हाल्लीच्या वेळी । जणू दिवा ग संध्याकाळी ।
चहूकडची हवा दिसे पिवळी । भारी मजा ।
पिलहौसा जवळी पिलाहौसाजवळ चल राहू । विएटरमध्ये जाऊ ।
तमाशा ग पाहू । जगाचा पोट भरूनी । देतो मुंबई खरेदी करूनी ॥९॥

ही ग मुंबई नगरी । अगदी भरभर गुजरी । नळबाजार तूं राणी ग ।
तुझ्या ताब्यात सगळ्या कोळणी ग । रोज माव्हर देतील आणुनी ग ।
तुम्ही आमच्या पेढीवर बसा । कोणालाही पुसा । नावाचा माझ्या ठसा ।
फिरला तुझ्यावरुनी । देतो मुंबई खरेदी करूनी ॥१०॥

(चाल) देतो वाळकेश्रराचा डोंगर सगळाच तुला । अगं तुला ।
कापच्या मैदानावरती दस्त घेतला । अगं घेतला ।
ह्याशिवाय राणीचा बंगला हवालीच केला । अगं केला ।
देतो ठाकूरद्वार सारं । बसून तांव काट्यावर ।
दावतो सराफाची घरं तुला दुरूनी ।
देतो मुंबई खरेदी करूनी ॥११॥

शिवू नको मुका दे दुरूनी। देतो मुंबई खरेदी करूनी ॥

(चाल धुमाळी) परळपासून सरळ रस्ता । भायखळ्याच्या पुलावरता ।
तिथून पुढे लागल खालता.. उभा पारशी ।
सर जमशेटजी बाटलीवाला । ह्याचा दवाखाना तुला इनाम दिला निजायला बीन वारसी ॥१२॥

मोतीबाजार मुंबादेवी । भेंडीबाजार काळबादेवी । घ्यावी पायधुनीची फरशी ।
बोरीबंदर कोट किल्ला । कापाच्या मैदानातला । कमेटीचा बंगला देतो भेटी सरशी ॥१३ ॥

ताजमहाल प्यालेस हाटेल । तिथेच तुला भेटेल । त्यात वाटेल ती खा मेजवानी मजेदारशी ।
सेक्रेटरी हॉल । तुला काळा घोडा भाल । देतो कुलाब्याबी लाल हवा थंड गारसी ॥१४॥

फारस रोड दारूसाठीं । भांगवाडी गांज्यासाठी । चंदनवाडी राहाण्यासाठी । दिली सरशी ।
बटाट्याची चाळ । तू कायम संभाळ बरशी । तिथे बांधूनी चाळ । मग ताल धरशी ॥१५॥

काळी चौकी लालवाडी । सुपारीबाग ताडवाडी । आखंडबावडी कुईबावडी दिली खरेदी ।
बाजूबंद चंद्रहार । पानपोत पादर चार । सोनाराला घडायला दिली वर्दी ॥१६॥

ट्रामगाड्या मोटारगाड्या । हजार देतो खटार गाड्या । व्हिक्टोरिया थोड्या नव्या रंग जरदी ।
धनी माझा मोठा नारी काय तुला तोटा । एका झटक्यात करू आम्ही प्यादी फरदी ॥१७॥

वाडी बंदरी माल माझा । कुलाब्याला कापूस ताजा । फतरी बंदरावरती । फौजी अरब गारदी ।
काळया गोर्‍या पलटणी । लष्कराची दाटनी सैन्याची वाटणी होती एक सरशी ॥१८॥

तुझ्यासाठी झटापटी । आम्ही केल्या खटापटी । खर्‍या झाल्या वाटाघाटी । मानमर्दी ।
तुला मला नावं । ठेवतो सारा गाव । येता जाता । निंदा करती नारी नरदी ॥१९॥

साड्या चोळ्या काय कमी । मारवाड्यांनी घेतली हमी । बसून खावे खूप नामी बिन दर्दी ।
गोल पिट्टा बहाल तिथे नवा रंगमहाल । तुला खुतनीची लाल केली गादी गर्दी ॥२०॥

सफेत गल्लीत राशील । तर किमतीने खाशील । आणि नामचंद होशील । मग तुझी जाईल सरदी ।
गुलाबी पावडर । तोंड धुवून लाव वर बस खुर्चीवर मग होईल गदीं ॥२१॥

बोरीबंदर मशीदबंदर । भायखिळा वाडीबंदर । माजगाव करीरोड चिंचपोकळी ।
येवढी स्टेशनं विकूनश्यानी । तुझ्या साडी-चोळीमागे । ताडवाडी आम्ही काल विकली ॥२२॥

तुझ्यासाठी भली मोठी । तयार केली चौपाटी । गिरगांवच्या पाठीमाठी । जागा राखली ।
मुगभाट कांदेगल्ली । तुझ्यासाठी तयार केली । ग्रांटरोड कुलाब्याला रेल टाकली ॥२३॥

जी.आय.पी., रेल्वे सारी । बी.बी.सी.आय., रेल दुसरी । आणखी ट्रामगाडी तिसरी । तुझ्या नांवे आखली ।
कमेटीचा सारा फाळा । मुंबईचा आला तेवढा तुझे नावे जमा केला बाकी चुकती ॥२४॥

रियन थेटर सार्‍यांत मोठं । एलपिष्टन आहे धाकटं । मुंबई थेटर आहे छोटं । पण खूप नकली ।
व्हिक्टोरिया थेटर मोठं । कारोशान आहे धाकटं । राईल थेटर जळलं त्याची राख फेकली ॥२५॥

गिरगांवची कांदेवाडी । विकून केली बाळी बुगडी । खेतवाडीवर नवं कर्ज काढलं ।
माजपट्टा कुलूप, चार । त्याला माणिक हिरवीगार ।
त्याच्याकरता टांकसाळंवर पाणी सोडलं ॥२६॥

दारूखाना मदनपुरा । जिमखाना काझीपुरा । मोदीखाना कामटपुरा । गल्ल्या पंधरा ।
पवळीला राजमहाल । चंद्रीला ताजमहाल । हवाईला राणी केली दाणे बंदरा ॥२७॥

स्वतंत्र वाडा बांधला । नानासाठी घोडा आणला । भिल्लिनीच्या किल्ला भोवती ।
खडा पाहारा ।
सुंदरीला सदरबाजार । मंदिराला खिडक्या हाजार । सभोवती कारंज्याच्या नीट धारा ॥२८॥

पवळीला काळा घोडा । चंद्रीला पारशी खड़ा । हवाईला नागपाडा दिला राद्याला ।
माहीमचा हलवा । काय । चालवा । नानीच्या रतीबाला गोड खायाला ॥२९॥

(चाल) त्या गोलपिट्यातील नारी खर्‍या पद्मिनी ।
आणि सफेत गल्लीतील अप्सरावानी ॥३०॥

पंजाबी, मिंदी, सुलतानी, मुसलमानी ।
यहुदिनी, चिनी, ऑफसानी, मिंधी गुजरणी ॥३१॥

त्यामधें कैक डंकीनी कैक शंकीनी ।
बंगाली तेलंगणी वाणी परभिनी ॥३२॥

ह्याशिवाय जपानी इंग्रजी आणि जर्मनी ।
माळणी साळणी तेली तांबोळणी ॥३३॥

कानडी मद्रासी आरबिनी सौदामिनी ।
आणि डंकनरोडवर त्या गे महारणी मांगिणी ॥३४॥

(चाल) तुला पुजायला देतो भुलेश्वर मुंबादेवी ।
पंचमुखी मारुती कालकाईदेवी ॥३५॥

नवसाला पावली देवी सेवा तिची करावी ।
त्या काळ्या मारुतीला नित्य सांजवात लावी ॥३६॥

त्या घोलप देवाला खेटी रोज घालावी ।
कुलस्वामी आपली महालक्ष्मी ध्यानांत राहावी ॥३७॥

त्या शनीदेवाला तेलाची आंघोळ घालावी ।
त्या माया हाजनीला दार्यात बत्ती लावावी ॥३८॥

त्या जंगली पिराला शेरा आणि धूप दावी ।
भायखळ्याच्या म्हसोबाला साखर वाटीत फिरावी ॥३९॥

(चाल) नारी जेकब सर्कल । तुला असल दखल । तिथे रस्ता चुकल । मग भकशील कोणत्या वाटेने । तुला एकटीला मवाली गाठून । दागदागिने घेतील लुट्न । तु ऐटीनें जाशील नटून । अवचीत उठून । कान तुझा काटून । लावतील पिटून । टाकतील वाटून । फेकतील मारून । देतो मुंबई खरेदी करून ॥४०॥

(चाल) कुलाब्याच्या दांडीवरती । तुझ्या नावाची बत्ती फिरली ।
नारी पाहिली तुला । चळ भरला मला । सव्वा महिना झाला ।
तुझ्या नादात खरोखर फसलो । कैक वेळां उपाशीच बसलो ।
येताजातां बायकोवर रुसलो ॥४१॥

(चाल) दिला घडीमार । गेलं आंग हिरवेगार अगदी । मरणाला वार ।
अशी फणचीच्या रागाची धर्ती । रात्री जगती का आता मरती ॥४२॥

घे इनाम मुंबई नगरीच्या । गिरण्या सार्‍या ।
रात्रभर ट्रामगाड्यां लोकलगाड्या करती येरझार्‍या ॥४३॥

याशिवाय सुंदर हवेल्या । कोर्टातल्या कचेर्‍या ।
चहूकडे शिमिटाच्या माड्या बांधल्या नार्‍या ॥४५॥

तुझ्यासाठी मोटारगाडया नेतील स्वार्‍या ॥४६॥

वायरच्या गाडया नवीन करी येरझा‍र्‍या (मुंबई नगरी) ॥४७॥

मुंबई नगरी भर भर गुजरी सारी नाटकशाळा ।
झाशीमध्ये ऐंशी सहस्र राण्यांचा मेळा ॥४८॥

पुण्यामधें जुन्या कचेर्‍या हिशेब घ्या ताळा ।
कलकत्त्याला माल संपला काला कित्ता सगळा ॥४९॥

सातार्‍याला आजीमतारा तिथे पहारा आगळा ।
खुर राहाण्याचे ठिकाण कोल्हापूर गड आमचा पन्हाला ॥५०॥

भगवा झेंडा खुणेशी लाविला घ्या तुम्हीं पड़ताळा ।
पठ्ठे बापूराव कवीची शाळा इंग्रजी टंकशाळा ॥५१॥
(संपादित)

प्रा. चंद्रकुमार नलगे
'महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव' या प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.