A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कधी मी पाहिन ती पाउले

सामर्थ्याहुन समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय?
पडे अहल्या शिळा त्यास्थळी येतिल प्रभुचे पाय!

कधी मी पाहिन ती पाउले?

पाहिन केव्हा तो सोहळा
प्रभुचरणांचा स्पर्श कपाळा
आनंदाश्रू झरतिल डोळा
भाग्यच माझे दिसेल मजसी मूर्त उभे ठाकले!

रणांत जिंकुन कौरवसेना
यशसिद्धीच्या करित गर्जना
अभये अर्पित साधुसज्जना
पाच प्राणसे येतिल पांडव विजयाने न्हाले!

मारून रावण कपटी कामी
अशोकवनि या येतील स्वामी
वाहणार हे पदी प्राण मी
भेटीसाठी अशा अलौकिक कालचक्र थांबले!

देवाहुनहि समर्थ भक्ती
स्वरांत माझ्या अमोघ शक्ती
सुफलित व्हाया माझी उक्ती
पंचकन्यका अर्पण करिती पुण्य मला आपले
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट- सुवासिनी
गीत प्रकार - चित्रगीत
अहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.
उक्ती - बोलणे, भाषण, वाक्य.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.