A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कळण्यासाठी मोल सुखाचे

कळण्यासाठी मोल सुखाचे तुला विधीने दु:ख दिले
दु:खामधुनी निज सौख्याची फुलवित जा तू गोड फुले

प्रकाश उजळी अंधारातुन
शोधी मंगल अमंगलातुन
कीर्तिरुपाने जगण्यासाठी तुला विधीने मरण दिले
दु:खामधुनी निज सौख्याची फुलवित जा तू गोड फुले

अमृत चाखी जहरामधुनी
शोधी पुण्य तू पापामधुनी
छायेचे रे मोल कळाया तुला विधीने ऊन दिले
दु:खामधुनी निज सौख्याची फुलवित जा तू गोड फुले

नरात शोधी तू नारायण
मिळण्याआधी असते वणवण
द्रव्याचे रे मोल कळाया तुला विधीने दैन्य दिले
दु:खामधुनी निज सौख्याची फुलवित जा तू गोड फुले

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.