A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कलेकलेने चंद्र वाढतो

कलेकलेने चंद्र वाढतो, चिमणा नंदाघरी
पाजळल्या या अमृतज्योती, देवकीच्या अंतरी

प्रतिबिंबाचे लखलख आता घरोघरी हे दिवे
देवकीच्या या आनंदाने विश्व उजळले नवे
सुरांगनांच्यासवे उतरले नक्षत्रांचे थवे
त्रैलोक्याची आज दिवाळी करावया साजरी

हर्षपुराने चढू लागले यमुनेचे पाणी
देवकीच्या या नयनामधुनी यशोदेच्या नयनी
घडे भरुनिया बघा चालल्या गोकुळच्या गौळणी
झडत चौघडे माया येता मथुरा-गोकुळपुरी

चंदन चर्चुंनी हर्षजलाने न्हाऊ घातले बाळा
नाव ठेवण्या जमला होता सुवासिनींचा मेळा
घ्या गोविंदा, घ्या गोपाळा, अनंत नामे बोला
जगदोद्धारा धरी यशोदा पाळण्याची दोरी