A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कलिका कशा ग बाई

कलिका कशा ग बाई भुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
सजूनधजून बाई, भरात कलली जाई
लाजूनबुजून बाई, उरात फुलली जुई
फुलली जाई फुलली जुई
जाईजुई जाईजुई
फुलल्या कशा ग बाई फुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

अवखळ वार्‍यात काळोख वाहे
थरथर पानात भरून राहे
सलज्ज कोवळ्या जाईजुईच्या
मनात चांदणे चोरून पाहे
भवती काजळी राही, धवल ठसली जाई
तमाळ रंगात काही, विभोर हसली जुई
झुलली जाई झुलली जुई
जाईजुई जाईजुई
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

मुग्ध हरपल्या कुपित, चित्तचोर गंध कोंदला
लुब्ध उकलता गुपित ओसंडून मुक्त नांदला
नितळ निवांत पाही नाजूकसाजूक जाई
झाकून तळवे राही मिटून लोचन जुई
डोलली जाई डुलली जुई
जाईजुई जाईजुई
डुलल्या कशा ग बाई डुलल्या
इवल्या फुलात बाई खुलल्या

रात्र संपली, निळी उषा सुरम्य रंग रंगली
माळ गुंफली पहाट पाकळ्यां-कळ्यांत दंगली
ढळल्या दिशांत दाही नाचली मोहक जाई
वळल्या नभांत वाही सुगंध साजिरी जुई
कळली जाई कळली जुई
जाईजुई जाईजुई
कळल्या कशा ग बाई कळल्या
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
कलिका कशा ग बाई भुलल्या
फुलल्या कशा ग बाई फुलल्या
विभोर - मग्‍न, तल्लीन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.