A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काळ्या मातीत मातीत

काळ्या मातीत मातीत तिफन चालते
वीज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदीबैलाच्या जोडीला
संगं पार्वती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवरी सरी येती, माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते, वाट राघूची पाहते
राघू तिफन हानतो, मैना वाटुली पाहते

झोळी झाडाला टांगून राबराबते माउली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हाजोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते, कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो, काटा पायांत रुततो
काटा पायात रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं, हिरवं सपान फुलतं
कस्तुरी - एक अतिशय सुगंधी द्रव्य.
तिफण - तीन फण्यांची- शेतांत बी पेरण्याचे आऊत.