A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कसें जिवांना झुलवित जावें

कसें जिवांना झुलवित जावें;
उपजत होती तुला कला ती.
कसें कुणाला फुलवावें अन्‌
कशी करावी क्षणांत माती.

कसे वदावे शब्द दुहेरी;
कसें पांघरावें परकेपण;
कसें पहावें- नसतां पाहत
हलक्या हातें घालावे घण.

कशी धरावी मान करारी;
कशी करांनी दाबावी कळ;
कशी स्‍निग्धता आणुन नेत्रीं
आशेचें उठवावें मोहळ.

कसें ढगांतुन मुरकत जावें
केसामधुनी गुंफुन तारे !
क्षणांत द्यावे दोन करांनीं,
क्षणांत घ्यावें काढुन सारें.

उपजत होती तुला कला ती
उपजत होतें मला खुळेपण;
तुझ्या कलेंतच तुजला तृप्ती;
फक्त रितें हें माझें जीवन.
गीत - विंदा करंदीकर
संगीत - वसंत आजगांवकर
स्वर- वसंत आजगांवकर
गीत प्रकार - कविता
  
टीप -
• काव्य रचना- १४ सप्टेंबर १९५२.
• मुंबई आकाशवाणी तसेच दूरदर्शनसाठी हे गीत ध्वनिमुद्रित केले गेले होते. ते आता उपलब्ध नाही. एका मैफिलीतील हे सादरीकरण 'आठवणीतली गाणी'स उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. वसंत आजगांवकर यांचे मन:पूर्वक आभार.
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.