A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी नशीबानं थट्टा आज

दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो!

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

सत्त्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली
नार सूड भावनेनं उभी पेटली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गांव वेडा झाला
त्यांनी लाज-भीड-नीती सारी सोडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवर्‍यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा, पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!

याची देही याची डोळां पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!
गीत- जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर , सुधीर फडके
चित्रपट- पिंजरा
राग- तोडी
गीत प्रकार - चित्रगीत
रंक - भिकारी / गरीब.

 

Random song suggestion
  उषा मंगेशकर, सुधीर फडके