जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
स्वराज्यतोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
कोट छातीचा अभंग त्याला
कधी न जातील तडे
माय भवानी प्रसन्न झाली
सोनपाउली घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाऊल पडते पुढे !
बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाऊल पडते पुढे !
शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी
जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, हेमंतकुमार, मीना खडीकर |
चित्रपट | - | मराठा तितुका मेळवावा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |
अनुष्ठान | - | स्थापना / आचरणे. |
कोट | - | तट, मजबूत भिंत. |
रिपु | - | शत्रु. |
स्वये | - | स्वत: |
(१)
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥२॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥३॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥४॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥५॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥६॥
तुकाराम गाथा (९८१)
(२)
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) (गीता (३.३५)
(२)
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शान्ताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
ही माहिती उलगडून सांगितल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे, धनश्री लेले आणि डॉ. माधव खालकर यांचे आभार.
यात बाळच्या आवाजात काही श्लोक आहेत, त्यामागे फार वाद्यांची योजना असणार नव्हती म्हणून या कडव्यांच्या वेळी वादक मंडळी जेवायला निघून गेली; पण दीदीला श्लोकांच्या मागे व्हायब्रोफोन हे वाद्य वाजायला हवं होते. बाळ गायला उभा राहिला होता आणि वादक तर निघून गेलेले. मग तिनं उषालाच व्हायब्रोफोन कसा वाजवायचा ते सांगितलं. हे वाद्य अवघड असतं. उषानं यापूर्वी कधीच वाजवलं नव्हतं; पण थोड्याशा सरावानंतर ते जमायला लागलं. या गाण्यात ऐकायला येतो तो व्हायब्रोफोन उषानंच वाजवला आहे.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' (शब्दांकन- प्रवीण जोशी) या पुस्तकातून.
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.