A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की

काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

दिसं आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर
त्या गोटमाळावर कुणबी सोडुनी नांगर
टाकी वैरण बैला म्होरं, घेतो विसावा घटकाभर
त्याची अस्तुरी सुंदर, आली घेउनी भाकर
पाय भाजत्याती चरचर अन्‌ कशी चालतीया झरझर
कांदा न्‌ भाकरी खाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

पळपळून म्या चौखुर, वळती करून आणल्यात गुरं
हणम्या बैल हाय ह्यो माजूर, देतो झुकांडी जातो दूर
गाय कपिली लई चातूर, दूधदूध पियाला भरपूर
गुरं पाण्यावर नेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

मी लोकाचा हाय चाकूर, जीव जमून होतोय चूर
धनी माझा लय्‌ मगरूर, मालकीण करी कुरकूर
पायामंदी नाही खेटूर, चिंधी फाटतीया टुरटूर
अरं दुपार टळून जाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

सदू सोनाराचा शिरीधर, मधु बामनाचा मुरलीधर
चोखू चांभाराचा चंदर, वरल्या आळीचा जालंधर
घराशेजारी आपली घरं, बाळपणातलं मैतर
अरं तुमच्यात सामील होऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
गीत - अप्पा कांबळी
संगीत -
स्वर- शाहीर निवृत्ती पवार
गीत प्रकार - लोकगीत
अस्तुरी - स्‍त्री.
कुणबी - शेतकरी.
वैरण - गुरांना घालावयाचे गवत, कडबा, चारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.