A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कांट्याच्या अणिवर वसति

कांट्याच्या अणिवर वसति तिन गांव ।
दोन ओसाड, एक वसेचि ना ॥१॥

वसेचि ना तेथें आले तीन कुंभार ।
दोन थोटे, एका घडीच ना ॥२॥

घडीच ना त्यानें घडलीं तीन मडकीं ।
दोन कच्चीं, एक भाजेचि ना ॥३॥

भाजेचि ना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे, एक शिजेचि ना ॥४॥

शिजेचि ना तेथें आले तीन पाहुणे ।
दोन रुसले, एक जेवीच ना ॥५॥

जेवीच ना त्याला दिल्ह्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या, एक फळेचि ना ॥६॥

फळेचि ना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले, एक जगेचि ना ॥७॥

जगेचि ना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे, एक चालेचि ना ॥८॥

चालेचि ना तेथें आले तीन पारखी ।
दोन आंधळे, एका दिसेचि ना ॥९॥

दिसेचि ना त्याला दिल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या, एक लागेचि ना ॥१०॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवांचोनि कळेचि ना ॥११॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - स्‍नेहल भाटकर
स्वर- स्‍नेहल भाटकर
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• हे कूट पद आहे.
अणी - शस्‍त्राचे बारीक टोक.
टोणगा - रेडा.
थोटा - हात तुटलेला मनुष्य.
रांधणे - शिजवणे.
वांझ - संतान न होणारी स्‍त्री.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या अनेक अभंगांचे संग्रह गेल्या कित्येक वर्षांपासून निघत आहेत. त्यांतील (थोरले) सातारकर महाराजांच्या 'सकल संत गाथा'; जुन्या काळातील 'सर्वसंग्रह' आणि त्या जातीतील गो. नी. दांडेकर प्रभूर्तीचे 'भक्तिमार्गप्रदीप' इत्यादी प्रसिद्ध आहेत.

या ग्रंथांतून ज्ञानेश्वरलिखित अनेक अभंग प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यातील काही अभंगांच्या मूळ कवीबद्दल संदेह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दांडेकरांच्या 'भक्तिमार्गप्रदीप'मध्ये कसोशीने ज्ञानेश्वरांनीच मुळात लिहिलेले अभंग दिले आहेत. परंतु वारकर्‍यांच्या संग्रहातून गोळा करून एकत्र दिलेल्या अनेक संग्रहांत हे तारतम्य राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांच्या पदांचा अभ्यास करताना पंडित आवळीकर यांच्या दृष्टोत्पत्तीस आलेली अशी एक हकीकत लिहिली, ती महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या २२ जानेवारी १९७८ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अंकात दिली आहे. 'ज्ञानदेवांचे (?) एक कूट पद' या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या लेखात कै. वामन दाजी ओक संपादित 'काव्यसंग्रहा'च्या तेराव्या पुराणाचा 'अनेक कविकृत पदे, कटाव, लावण्या' असलेल्या 'पदसंग्रह' भाग पहिल्याचा संदर्भ देऊन असे प्रतिपादिले होते की,

"या संकलनात ज्ञानदेवांची २२ पदे आहेत. ही सर्व रचना ज्ञानदेवांचीच आहे काय, हा प्रश्न ही पदे वाचताना पदोपदी आपल्यापुढे उभा राहात असतो. ज्ञानदेवांच्या शंकास्पद (Apocryphal) वाङ्मयात त्यांची गणना करावी लागेल असा विचार माझ्या मनात येतो. या बावीस पदांत 'काट्याच्या अणिवर वसति तीन गाव (दोन ओसाड, एक वसेचि ना) या नावाचे एक कूट पद आहे. या पदाची जात भारूडाची आहे. पदाच्या अखेरीस 'ज्ञानदेव म्हणे' असा उल्लेखही आहे. पण तेवढ्या आधारावर हे पद ज्ञानदेवांचे आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या पदाची भाषाही ज्ञानदेवकालीन किंवा /आणि ज्ञानदेवांची आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे."

त्यानंतर या लेखात त्या गीताची संहिता दिलेली असून म्हटले आहे की, हे पद परंपरेने ज्ञानदेवांचे मानले गेले आहे. आजही भजनी मंडळी ज्ञानदेवांचे म्हणूनच हे पद गाताना दिसतात.

या लेखाच्या पुढील भागात हे गीत ज्ञानेश्वरांचे मानण्यात भाषेची होणारी अडचण, ज्ञानेश्वर करणार नाहीत अशा 'रुपये 'सारख्या अर्वाचीन शब्दाचा उपयोग इत्यादीसंबंधीचा उल्लेख करून अगदी याच ज्ञानेश्वरांच्या गीताच्या अर्थाचे कवि पुरंदर दासांचे एक संपूर्ण कन्नड पद मराठी अर्थासह दिले आहे. त्या कन्नड गीताच्या पहिल्या ओळी आहेत-
मुळ्ळ कोनेय मेले मुरू केटेय कट्टी ।
यर्दु बरिदु, वंदु सुंदळिल्ल ॥
(काट्याच्या टोकावर तीन तळी बांधली । दोन कोरडी, एक भरलेच नाही ॥)

आपल्या स्फुट रचनेत शेवटी 'बापरखुमादेवीवरू' असा स्वनामनिर्देश करण्याचा ज्ञानदेवांचा प्रघात पाहता या पदातील 'ज्ञानदेव म्हणे' ही मुद्रिका या पदाला ज्ञानेदवांच्या शंकास्पद वाङ्मयात ढकलते, असे सरतेशेवटी या लेखात प्रतिपादन करण्यात आले आहे.

ज्ञानदेवांच्या नाममुद्रांचे स्वरूप
श्रीज्ञानदेवांचे आजपर्यंत उपलब्ध अभंग ११२१ आहेत. श्री. प्र. न. जोशी यांचा 'सार्थ श्रीज्ञानदेव अभंगगाथा आवृत्ती दुसरी' यात आतापर्यंत उपलब्ध असलेले, ज्ञानदेवांचे म्हणून जे अभंग आहेत त्या अभंगांत चार प्रकारच्या नाममुद्रा आढळतात.
१. 'बापरखुमादेवीवरू विठ्ठलु' किंवा 'बापरखुमादेवीवर विठ्ठल' (सुमारे पाचशेदा)
२. ज्ञानदेव (अडुसष्टदा)
३. ज्ञानेश्वर (अडुसष्टदा)
४. निवृत्तिदासु (एकवीसदा)
यापैकी 'बापरखुमादेवीवरू विठ्ठलु' ही सर्वांत जास्त वेळा आलेली नाममुद्रा ज्या अभंगात आहे ते अभंग सर्वांगसुंदर आहेत. विशेषतः काव्यदृष्ट्या सरस आहेत. आणि उपमा, दृष्टांत, शब्दरचनेचे सौंदर्य यात ते ज्ञानेश्वरीतील ओव्यांशी बरोबरी करतात. ज्या अभंगात 'बापरखुमादेवीवरू' ही नाममुद्रा आहे त्याच्या मागेपुढे ज्ञानदेवांचे नाव कुठल्याही प्रकारे म्हणजे ज्ञाना, ज्ञानिया, ज्ञानोबा, ज्ञानेश्वर वगैरे सहसा येत नाही. स्वतः 'ज्ञानदेव' या रचनाकाराच्या जागीच 'बापरखुमादेवीवरू विठ्ठल' अशी नाममुद्रा येते. यात बाप आणि रखुमादेवीवर ही दोन विशेषणे आहेत. ती अर्थात विठ्ठलाचीच आहेत..."
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
'भावगीतकार ज्ञानेश्वर' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सुदिन ग्रंथ प्रकाशन, पुणे.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.