A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केशीं तुझिया फुलें

केशीं तुझिया फुलें उगवतिल, तुला कशाला वेणी?
चांदण्यास शिणगार कशाला? बसशिल तेथें लेणीं !

काळोखांतहि नीळ फुलवशिल, चमेलींत वनवाटा
तळमळणार्‍या पुळणीवर अन्‌ फेनमोगरी लाटा

पहाटशी तू अमल निरागस, संध्येपरिसहि भोळी
जुन्याच ओळी गुणनुणताना जमतिल सोनपिसोळीं

तुझी पावलें भिडतां येइल तीर्थकळा पाण्याला
तुझ्या स्वरांच्या स्पर्शें येइल अर्थ नवा गाण्याला

वाळूंतिलही तृणपात्याशीं तुझें कोंवळें नातें
तुझ्या दिठीने क्षितिजींचेंही अभ्र वितळुनी जातें

अशा तुला कां हवें प्रसाधन? तूच तुझें ग लेणें
तुला पाहिल्यामुळें आमुचें कृतार्थ इथलें येणें !
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - श्रीधर फडके
स्वर- श्रीधर फडके
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २८ फेब्रुवारी १९७२.
अमल - शुद्ध.
तृण - गवत.
पुळण - समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भाग.
फेनमोगरी - समुद्रफेसासारख्या शुभ्र व मोगर्‍यासारख्या सुवासिक.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
सोनपिसोळी - सोनेरी फुलपाखरे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.