खबरदार जर टांच मारुनी
सावळ्या :
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
कुण्या गांवचे पाटिल आपण कुठें चाललां असे
शीव ही ओलांडून तीरसे?
लगाम खेंचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणीं !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेउं ही
मला का ओळखलें हो तुम्ही?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असें,
हें हाडहि माझें लेचेंपेचें नसे
या नसानसांतून हिंमतबाजी वसे
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
स्वार :
मळ्यांत जाऊन मोटेचें तें पाणि भरावें तुवा
कशाला ताठा तुज हा हवा?
मुठींत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरें
वीर तूं समजलास काय रे?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठें तव भाला-बरची तरी?
हें खड्गाचे बघ पातें किति चमकतें
अणकुचीदार अति भाल्याचें टोंक तें
यापुढें तुझी वद हिंमत का राहते?
खबरदार जर पाऊल पुढें टाकशील, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
सावळ्या :
आपण मोठे दाढीवाले अहां वीर बायकी
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हां माहिती न का?
दावितां फुशारकी कां फुका?
तुम्हासारखे असतील किती लोळविले नरमणी
आमुच्या शिवबानें भररणीं
मी असें इमानी चेला त्यांचेकडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचेपुढें
देईन न जाऊं मी शूरवीर फांकडे
पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
लालभडक तें वदन जाहलें बाळाचें मग कसें
स्वार परि मनीं हळूं कां हंसे?
त्या बाळाच्या नयनीं चमके पाणी त्वेषामुळें
स्वार परि सौम्य दृष्टीनें खुले.
चंद्र दिसे एक जणूं दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर-
"आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हां बोल एकदां
'खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !' "
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
कुण्या गांवचे पाटिल आपण कुठें चाललां असे
शीव ही ओलांडून तीरसे?
लगाम खेंचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणीं !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेउं ही
मला का ओळखलें हो तुम्ही?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असें,
हें हाडहि माझें लेचेंपेचें नसे
या नसानसांतून हिंमतबाजी वसे
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
स्वार :
मळ्यांत जाऊन मोटेचें तें पाणि भरावें तुवा
कशाला ताठा तुज हा हवा?
मुठींत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरें
वीर तूं समजलास काय रे?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठें तव भाला-बरची तरी?
हें खड्गाचे बघ पातें किति चमकतें
अणकुचीदार अति भाल्याचें टोंक तें
यापुढें तुझी वद हिंमत का राहते?
खबरदार जर पाऊल पुढें टाकशील, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
सावळ्या :
आपण मोठे दाढीवाले अहां वीर बायकी
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हां माहिती न का?
दावितां फुशारकी कां फुका?
तुम्हासारखे असतील किती लोळविले नरमणी
आमुच्या शिवबानें भररणीं
मी असें इमानी चेला त्यांचेकडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचेपुढें
देईन न जाऊं मी शूरवीर फांकडे
पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
लालभडक तें वदन जाहलें बाळाचें मग कसें
स्वार परि मनीं हळूं कां हंसे?
त्या बाळाच्या नयनीं चमके पाणी त्वेषामुळें
स्वार परि सौम्य दृष्टीनें खुले.
चंद्र दिसे एक जणूं दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर-
"आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हां बोल एकदां
'खबरदार जर टांच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !' "
गीत | - | वा. भा. पाठक |
संगीत | - | |
स्वर | - | अमेय पांचाळ, नंदेश उमप |
गीत प्रकार | - | बालगीत, स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |
चिंधड्या | - | कापडाचा लहान तुकडा. |
बरची | - | भाल्यासारखे एक शस्त्र. |
राई | - | अरण्य, झाडी / मोहरी. |
शीव | - | हद्द / मर्यादा. |