A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिया आज माझी नसे साथ

प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या

नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेवीण आरास जाईल वाया

फुले सान झेलू तरी भार होतो
पुढे वाट साधी तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या

न शांती जिवाला न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया

अता आठवीता तशा चांदराती
उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती
उशाला उभी ती जुनी स्वप्‍नमाया
मौक्तिक - मोती.
सान - लहान.
यशवंत देव यांनी 'स्वर आले दुरुनी' हे गाणे चालीवर लिहून पाठवले.. इनलॅंड लेटवर, नागपूरहून..

पंधरा-वीस दिव्सांनी देवसाहेब छोट्याशा सुट्टीसाठी नागपूरहून मुंबईला आले. त्यांचेकडून तसेच चालीवर दुसरे गीत लिहून घेतले- 'प्रिया आजा माझी नसे साथ द्याया.'

दोन्ही गीते बाबूजी, सुधीर फडके, मनापासून शिकले. शिकताना कसलीही तडजोड नाही. खरे तर मी त्यांचा सहाय्यक, शिष्य. पण तेव्हा मात्र मी संगीतकार व ते गायक या नात्यानेच मी शिकवीत असलेल्या स्वररचनेतली जागा न्‌ जागा ते विद्यार्थ्याप्रमाणे शिकले.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी ,लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.