A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संथ निळें हें पाणी

संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधुनी
शीळ घालितो वारा

दूर कमान पुलाची
एकलीच अंधारीं
थरथरत्या पाण्याला
कसलें गुपित विचारी?

भरून काजव्यांनीं हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होउनी तेथें
अवचित थबके वारा !

किरकिर रातकिड्यांची
नीरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरती अंधारीं !

मधेंच क्षितिजावरुनी
वीज लकाकुनि जाई
अन् ध्यानस्थ गिरीही
उघडुनि लोचन पाही !

हळुच चांदणें ओलें
ठिबके पानांवरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणांमधुनी !

संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधानें
मौनाचा गाभारा !
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - कौशल इनामदार
स्वर- अमेय दाते
गीत प्रकार - कविता
  
टीप -
• काव्य रचना - ७ जून १९५१, पुणे.
गिरी - पर्वत, डोंगर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.