A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे

जयांना कोणि ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे

सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे

जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे
गीत - साने गुरुजी
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, प्रार्थना
  
टीप -
• काव्य रचना - धुळे तुरुंग, मे १९३४.
मोद - आनंद
विकल - विव्हल.

 

Print option will come back soon