A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खरेच माझा जगावयाचा

खरेच माझा जगावयाचा विचार होता..
खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !

तुझा इथेही कसा कळेना, सुगंध आला?
कसा तुझा तो फुलावयाचा प्रकार होता !

दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही,
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता !

अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो,
तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !

अजूनही मी कधीकधी मोहरून जातो..
कितीकिती लाघवी तुझा तो नकार होता !

कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू..
खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता !

हरेक वेळी तुला दिली दूषणे, जगा, मी,
हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता !

अखेर गावामधून त्या मी निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता !
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार - कविता
उषा - पहाट.
दूषणे - नावे ठेवणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.