नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा ।
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाईं पुष्पवर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
वर्णअभिमान विसरली याती ।
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥
होतो जयजयकार गर्जत अंबर ।
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥
| गीत | - | संत तुकाराम |
| संगीत | - | श्रीनिवास खळे |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| राग / आधार राग | - | भूप, नट |
| गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
| अनुपम्य | - | अतुलनीय. |
| नवनीत | - | लोणी. |
| वैष्णव | - | विष्णुभक्त. |
खेळ मांडीयेला वाळवंटीं घाईं । नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी ।
किळकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥२॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाईं पुष्पवर्षाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥३॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥४॥
वर्णअभिमान विसरली याती । एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥६॥
संदर्भ- श्रीसंत तुकाराम यांची अभंगांची गाथा
संग्राहक- माधव कृष्ण देशमूख, शंकर वामन दांडेकर
सौजन्य- चित्रशाळा प्रकाशन, पुणे.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












संपूर्ण कविता / मूळ रचना