A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नववधू प्रिया मी बावरतें

नववधू प्रिया, मी बावरतें;
लाजतें, पुढे सरतें, फिरतें.

कळे मला तूं प्राणसखा जरि,
कळे तूंच आधार सुखा जरि,
तुजवांचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरतें.

मला येथला लागला लळा,
सासरिं निघतां दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडितां कसें मन चरचरतें !

जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळें
पळत निघावें तुजजवळ पळें-
परि काय करूं? उरिं भरभरतें.

चित्र तुझें घेऊनि उरावरि
हारतुरे घालितें परोपरि
छायेवरि संतोष खुळी करिं
तूं बोलावितां परि थरथरतें.

अता तूंच भयलाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरें घर तें !
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभु
स्वराविष्कार- लता मंगेशकर
पं. कुमार गंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १२ ऑक्‍टोबर १९२०, ग्वाल्हेर.
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- वसंत प्रभू.
• स्वर- पं. कुमार गंधर्व, संगीत- पं. कुमार गंधर्व.
'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून.

नोंद
आपली परमात्‍म्‍याच्या प्राप्तीविषयीची तळमळ किती दुबळी आहे व त्याच्याच प्रसादावाचून त्याची प्राप्ती कशी होणे नाही, हे या कवितेत सूचित केले आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर
  पं. कुमार गंधर्व