A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खेळेल का देव माझिया

खेळेल का देव माझिया अंगणीं?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनीं?

गोजिरा श्रीहरी साजिर्‍या पाउली
येईल हासत माझिया जीवनी

सानुले तें रूप उभें माझ्या दारीं
मज मागेल का दही-दूध-लोणी?

सांठवीन ज्यासी माझिया अंतरीं
पुरेल जीवींच्या आवडीची धणी
धणी - विपुलता.
भारतीय पुराणांत गाइल्या गेलेल्या चरित्रांतील राधा या बिचार्‍या स्त्रीवर फार मोठा अन्याय झाला आहे. या दुष्कृत्यांत संस्कृत आणि प्राकृत कवि, पुराणिक, कीर्तनकार, शाहीर, नाटककार सगळेच सहभागी आहेत. तमाशांतून बिचार्‍या राधेचे धिंडवडे काढणार्‍या अल्पशिक्षित किंवा अशिक्षित लावणीकारांची अवस्था एक वेळ समजूं शकते पण सुशिक्षितपणाची बिरुदें मस्तकीं वागविणार्‍या आधुनिक कविबुवांनिहि एकाची धर्मपत्‍नी असलेल्या राधेला "तुझा आंबाडा सैल कुणीं केला?" असा मार्मिक [!] प्रश्‍न विचारला आहे !

कायदेशीर रीत्या मी या सर्वांना न्यायासनासमोर खेचूं शकलों असतो तर- ! असूं द्या. मी जनतेच्या न्यायालयांत राधेची कैफियत मांडीत आहें.

प्रत्येक अवतारांत सन्‍त हे भगवंताचे सहप्रवासी असतात, असा संकेत आहे. माझी राधामाई त्यांतीलच एक आहे. कृष्णावतारांत ती श्रीहरीवर पुत्राहून आगळें प्रेम करून धन्य झाली. राधेला पुत्र झाला असल्याचा उल्लेख कुठेंहि नाहीं. मातेचें स्‍नेहाळ रूप लेऊन माझी राधामाई या नाटकांत प्रेक्षकांसमोर येत आहें.
(संपादित)

गो. नि. दांडेकर
'राधामाई' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अत्रे प्रिंटिंग प्रेस, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख