प्रणया लागे का नकळे नजर कुणाची प्रेमले ! ॥
सफल मानुनी प्रेमा ऐशा । वाहुं जन्म अपुले ।
अतुल भाग्य हे गमते मजला । मानवा जरी लाभले ॥
| गीत | - | मो. ग. रांगणेकर |
| संगीत | - | मास्टर कृष्णराव |
| स्वर | - | मास्टर अविनाश |
| नाटक | - | कुलवधू |
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
| वानणे | - | वाखाणणे, वर्णन करणे. |
गंधर्व नाटक मंडळीत नाट्यपदांना रागदारीवर आधारीत भारदस्त चाली देणारे मास्तर कृष्णराव उर्फ कृष्णा मास्तर हे 'कुलवधू'चे संगीतकार होते. त्यांनी बदललेल्या काळानुसार स्वतःच्या नाट्यसंगीतात बदल घडवून त्यास शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवून कल्पकतेने भावगीताच्या वळणाने नटवले होते. मास्तर कृष्णराव हे गंधर्व नाटक मंडळीत गायक नट आणि संगीतकार म्हणून कार्यरत होते. गुरुवर्य पं.भास्करबुवा बखले यांच्या १९२२ साली झालेल्या निर्वाणानंतर त्यांचे बुद्धिवान पट्टशिष्य या नात्याने मास्तर या नाटक मंडळीतील सर्व संगीत विभाग सांभाळू लागले. त्यामुळे गुरुबंधू असलेले नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व गुरुवर्य पं. बखलेबुवांच्या निर्वाणानंतर मास्तरांना गुरुस्थानी मानू लागले. पुढे १९३३ साली कर्जाचा बोजा डोईजड झाल्यामुळे ही नाटक मंडळी बंद पडली.
ही नाटक कंपनी बंद पडण्यास काही कारणे होती आणि त्यातील महत्त्वाचे एक कारण म्हणजे तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाल्यामुळे सिनेमा बोलू लागला होता. बोलपटांच्या झंझावातामुळे मराठी संगीत रंगभूमीला काहीशी मरगळ येऊन उतरती कळा आली होती. परंतु 'कुलवधू' नाटकातील पदांच्या सर्वच्या सर्व चाली रसिकांच्या अगदी पसंतीस उतरल्या. या नाटकाच्या नवतेचा स्पर्श लाभलेल्या अभिजात संगीताने मराठी संगीत रंगभूमीला आलेली मरगळ झटकून टाकली. त्यामुळे ह्या नाटकाचे संगीत म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदीच ठरली. शास्त्रीय संगीतावर आधारीत परंतु बदललेल्या काळाची पाऊले ओळखून नाट्यपदांना कालानुरूप दिलेल्या भावगीत वळणाच्या चाली हे 'कुलवधू'च्या संगीतातील सर्वांत मोठं वैशिष्ट्य होतं.
'कुलवधू'च्या संगीताची नाट्यमय कथा
संगीत हा तर संगीत नाटकाचा आत्माच ! मूकपटांचा जमाना होता तेव्हा मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. पण नंतर बोलपटांच्या झंझावतामुळे मराठी संगीत रंगभूमीला काहीशी मरगळ आली होती. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्या आधुनिकतेचे वारे वाहू लागलेल्या काळात प्रेक्षकांची अभिरुचीदेखील बदलली होती. तासनतास चाललेले संगीत नाटक तल्लीन होऊन मनमोकळी दाद देत बघणारा व वन्समोअर देत नाट्यपदांचा मनसोक्त आस्वाद घेणारा मराठी रसिक दोन तासांच्या चित्रपटाकडे करमणुकीचे साधन म्हणून वळला होता. या सर्व बाबी विचारात घेऊन श्रीयुत मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन संस्थेने 'कुलवधू' हे संगीत नाटक निर्माण केले होते. परंतु नियोजित संगीत दिग्दर्शक डी. पी. कोरगावकर हे चाली देण्याचे काम पूर्ण न करता ऐनवेळी नाटक सोडून गेले होते. जाहीर केलेला नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग अगदी आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपला होता. नटांच्या अभिनयाच्या तालमी तयार होत्या पण संगीतकार उपलब्ध नसल्याने नाटकाचे संगीतच तयार नव्हते. सगळीकडे आधीच या संगीत नाटकाच्या धुमधडाक्यात जाहिराती व बातम्या झळकल्या होत्या, तसेच शुभारंभाच्या प्रयोगासाठी थिएटरपण आरक्षित करून ठेवले होते. रांगणेकर आणि नट संचाच्या तोंडचे अगदी पाणी पळाले होते. योगायोगाने त्यावेळी मास्तर त्यांच्या मुंबईतल्या दादरमधील घरी काही दिवस वास्तव्यास होते. तेव्हा रांगणेकर मास्तरांकडे या नाटकास संगीत देण्याची विनंती करायला म्हणून गेले, त्यावेळी मास्तरांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला. मग मास्तरांचे ज्येष्ठ संगीतकार मित्र श्रीयुत केशवराव भोळे यांनी या नाटकाला मास्तरांनी संगीत देण्याविषयी विनंती पत्र लिहून दिले कारण इतक्या कमी कालावधीत संगीत नाटकाला दर्जेदार चाली देण्याचे कार्य प्रतिभेचे वरदान लाभलेले शीघ्र संगीतकार मास्तर कृष्णरावच करू शकतील अशी केशवराव व इतर सर्वांनाच मनोमन खात्री होती. त्यांचे विनंती पत्र घेऊन रांगणेकर पुन्हा मास्तरांकडे आले. तेव्हा मात्र अजातशत्रू, भावनाप्रधान, कोमल व दयार्द्र अंतःकरणाच्या मास्तरांनी सर्वांची अडचण ओळखली आणि या नाटकास अत्यल्प कालावधीत त्वरित चाली देण्याचे कबूल केले.
खरं म्हणजे एका आठवड्यात नाटकाला कालानुरूप चाली देऊन त्या नटांकडून बसवून घेणे हे कार्य शिवधनुष्य उचलण्यासारखे होते. पण आपण उपकार करत आहोत अशी मात्र भावना अजिबात न आणू देता जात्याच गोड स्वभावाचे मास्तर लाघवीपणे म्हणाले, "वाह, ज्योत्स्नाबाई गाणार आहेत. तर मग जरूर चाली देतो." ह्या घटनेनंतर शीघ्रतेने एका आठवड्याच्या आत ह्या प्रतिभासंपन्न कलावंताने या नाटकासाठी कोणत्याही आधीच्या प्रचलित शास्त्रीय चीजांच्या चाली न वापरता पूर्णपणे स्वतंत्र अशा सहजसुंदर संगीत रचना करून सर्व नाट्यपदे ज्योत्स्नाबाई भोळे व गणपतराव मोहिते उर्फ मास्टर अविनाश ह्या प्रमुख गायक कलाकारांकडून अत्यंत मेहेनतीने बसवून घेतली. यातील 'क्षण आला भाग्याचा', 'मनरमणा मधुसूदना' आणि 'बोला अमृत बोला' या तीन पदांच्या चाली तर प्रतिभेचे वरदान लाभलेल्या मास्तरांनी एका दिवसांतच तयार केल्या. 'बोला अमृत बोला' या भैरवीतील पदाची तालीम चालू असताना मास्तरांनी त्या पदातील अवघड तानपलटे कमी करून नाट्यपद म्हणायला आटोपशीर असे केले. (पुढे मास्तरांनी या नाट्यपदाच्या भैरवीतील चालीवर आधारित रागदारीतील बंदिश त्यातील सर्व अवघड तानपलट्यांसहित बांधली होती व ती बंदीश ते त्यांच्या गानमैफलीत सादर करत असत, अशी आठवण ती बंदीश गाऊन मास्तरांच्या ज्येष्ठ कन्या संगीतकार वीणा चिटको विशद करत असत.)
तसेच मास्तरांनी बदललेल्या काळातील रसिकांची बदललेली आवड लक्षात घेऊन या नाटकामध्ये चित्रपटात असते तसे एखादे युगुल गीत घालावे म्हणून रांगणेकरांना आग्रह केला व त्याप्रमाणे 'भाग्यवती मी त्रिभुवनी झाले' हे युगुल गीत निर्माण केले गेले. युगुल गीताचा मराठी संगीत नाटकात केलेला हा पहिला प्रयोग मानला जातो. या पदांची तालीम सुरू असताना "मास्तर, मनरमणा मधुसूदना या पदाची चाल जरा बाळबोध वाटते," असे ज्योत्स्नाबाईंनी म्हटल्यावर मास्तरांनी त्यांना चॅलेंज दिले होते की या पदास वन्स मोअर मिळाला नाही तर मी संगीत दिग्दर्शन करण्याचे सोडून देईन. केवढा हा स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास !
'कुलवधू'चा शुभारंभ
अखेरीस २३ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत सकाळी संगीत ’कुलवधू’चा ऑपेरा हाऊसला शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्याच दिवशी दुपारी परळच्या दामोदर हॉलमध्ये या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला. एका सुंदर व अत्यंत सुश्राव्य नाटकाचा मराठी संगीत रंगभूमीवर जन्म झाला. 'बोला अमृत बोला' च्या अमृतस्वरांनी रंगदेवता प्रसन्न झाली. रसिकांनी या नाटकातील प्रत्येक पदास वन्स मोअर देऊन पसंतीची पावती दिली. मास्तरांच्या अपेक्षेप्रमाणे मनरमणा या पदालादेखील वन्स मोअर मिळाले. तेव्हा विंगेत बसलेल्या मास्तरांनी विजयी मुद्रेने हासत ज्योत्स्नाबाईंकडे पाहिले. ज्योत्स्नाबाईंनी प्रवेश संपल्यावर आत येऊन मास्तरांना खाली वाकून नमस्कार केला. या नाटकातील हिरोच्या तोंडची दोन पदेदेखील अत्यंत दर्जेदार व श्रवणीय आहेत; परंतु हे संगीत नाटक मुळातच हिरॉईन केंद्रित असल्याने हिरॉईनची भूमिका व पदे कांकणभर अधिक भाव खाऊन जातात.
या नवीन वळणाच्या दर्जेदार नाट्यसंगीतामुळे उतरती कळा आलेल्या मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी प्राप्त झाली. संगीत रंगभूमीकडे काहीशी पाठ फिरवलेला रसिक प्रेक्षक परत रंगभूमीकडे वळला. पुन्हा संगीत रंगभूमीला 'सोनियाचे दिन' आले. आजच्या अत्याधुनिक काळातदेखील जेव्हा रंगभूमीवर नव्या संचात हे संगीत नाटक सादर केले जाते तेव्हादेखील या नाटकातील दर्जेदार व सदाबहार संगीताला रसिकांची वाहवा मिळते. 'बोला अमृत बोला' ही भैरवी ऐकताना तर 'अमृताचे कलश होती रिते कानी, तरीही तृप्तीचा विराम नसे मनी !' अशी रसिक प्रेक्षकांची अवस्था होते.
(संपादित)
प्रिया फुलंब्रीकर
सौजन्य- masterkrishnarao.com
(Referenced page was accessed on 19 June 2026)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख