A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण होतीस तू काय झालीस

नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली

कोण होतीस तू, काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू

सुंदर रूप तुझे निर्मळ भारी
होतीस अशी तू पवित्र नारी
डोईवर पदर, पदरात चेहरा
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा
होती यशोदा तू, होतीस तारा तू
होतीस राधा तू, होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली
राजवैभव टाकून आली
काळ बदलला तूही बदलली
सार्‍यांना भुलवीत रसत्याने चालली
पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही
सडक लैला अशी बदनाम झालीस तू
तू अशी नारी होती, लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली हो‍ऊन लढलीस तू

कोण होतीस तू, काय झालीस तू

पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा
होतास असा तू मर्दाचा राणा
सिंहाची छाती होती, उरात आग होती
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती
होतास राम तू, होतास बुद्ध तू
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू
भगतसिंग तो महान झाला
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला
काळ बदलला, तूही बदलला
करीत इशारे तू रस्त्याने चालला
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी
सडक मजनू असा बदनाम झालास तू
तू असा शूर होता, लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू

लाजवंती कालची तू चंचल छछोर होई
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही
कोण होतीस तू, काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू

आखुड केस हे, आखुड कपडे
पाठ ही उघडी, पोट हे उघडे
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली
साडी बिचारी खाली घसरली
नवा तुझा ढंग हा बघण्याजोगा
पुढून मुलगी मागून मुलगा
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू
तू अशी नारी होती लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू

काल तुझ्या हाती तलवार होती
लढवय्याचा तू वारसा
आज तुझ्या हाती कंगवा
घडीघडी बघसी तू आरसा
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

काय तुझी वेषभुषा आता कहर झाला
कालचा हिरो हा आज झिरो झाला
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका
लांबलांब केस हे मिशिला चटका
तर्‍हा तुझी बायकी, बघण्याजोगी
पुढून मुलगा हा मागून मुलगी
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू
तू असा शूर होता लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  उषा मंगेशकर, चंद्रशेखर गाडगीळ