A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोणा कशी कळावी

कोणा कशी कळावी वेडांत काय गोडी
ती प्रेममूढतेची सुटती न गूढ कोडीं

सोडून नांवगांवा
शोधावया विसावा
तुडवीत कंटकांची ती वाट नागमोडी

लहरीवरी फिरावे
जळिं घेत हेलकावे
जाणोनि लोटिली मी या वादळांत होडी

दिसती अजाण भोळे
परि हे फितूर डोळे
माझ्या मनोगताची करतील ग चहाडी
गीत - राजा बढे
संगीत - पं. कुमार गंधर्व
स्वर- पं. कुमार गंधर्व
नाटक - सारस्वत
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४१.
कंटक - काटा.
चहाडी - चुगली, लावालावी.
मूढ - गोंधळलेला / अजाण.
राजा बढे यांच्या काव्यलेखनाने घडविलेला आणखी एक अभिनव प्रतिभाविष्कार म्हणजे त्यांनी वेळोवेळी इतर नाटककारांच्या नाटकांसाठी केलेले नाट्यगीतांचे लेखन हे होय. सर्वसाधारणपणे भारतीय प्रांतिक भाषांमध्ये जे नाट्यगीतलेखन झालेले आहे, हे त्या-त्या नाटककरांनी स्वतःच केलेले आहे. त्यामुळे आरंभीच्या काळात नाटककारांना 'कविश्री' असे म्हणण्याची पद्धत होती. मात्र, सर्वच नाटककारांना गीतलेखनाची कला वश झालेली नसल्यामुळे त्या नाटककारांच्या संहितेनुरूप फक्त गीते अन्य कवींकडून लिहून घेतली जात असत.

श्री. पार्श्वनाथ आळतेकरांच्या नाट्यसंस्थेत व्हॉईस कल्चर ट्रेनिंगपासून ते प्रत्यक्ष रंगभूमीवरील अभिनयाच्या पदार्पणामुळे राजा बढे यांना रंगमंचकीय नाट्यगीतांची सर्वार्थानं जाण आलेली होती, आळतेकरांच्या 'लिटल थिएटर्स'मध्ये सुप्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांची 'सारस्वत', 'माझ्या कलेसाठी'सारखी नाटके रंगमंचावर आली आणि तत्कालीन रंगभूमीवर येणार्‍या सामाजिक नाटकांपेक्षा या नाटकांचे वेगळेपण प्रेक्षकांच्या ध्यानात आले. 'कुंजविहारी' या आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या पौराणिक नाटकातील गीते स्वतः वरेरकरमामांनी लिहिली होती आणि त्यातील 'त्यजि भक्तासाठी लाज' सारखी त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय झालेली होती. याखेरीज 'सत्तेचे गुलाम', 'स्वयंसेवक', 'हाच मुलाचा बाप' इत्यादी आपल्या डझनवारी नाटकांतील पदे स्वतः वरेरकरमामांनीच लिहिली होती आणि ती रसिकादराला पात्र ठरली होती.

मात्र, पुढील काळात मामांनी आपल्या नाटकासाठी स्वतःच गीतलेखन करण्याचा आग्रह धरला नाही. वरेरकरांच्या नाट्यलेखन कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या नाट्यलेखन मंदिरावर 'सोन्याचा कळस' चढविणार्‍या 'भूमिकन्या सीता'ची गाणी ग. दि. माडगूळकरांनी लिहिली होती. एक संगीत नाटककार म्हणून ख्यातिप्राप्त झालेल्या वरेरकरांनी ज्या अन्य कवीला प्रथम आपल्या नाटकातील गाणी लिहिण्यास प्रवृत्त केले, अशा नाट्यगीतकारांत कविश्री राजा बढे यांच्या नावाकडे तर्जनी दाखवावी लागेल. 'सारस्वत' आणि 'माझ्या कलेसाठी' यांतील नाट्यगीतलेखनाने रसिकांना राजाभाऊंच्या नाट्यगीतलेखनाचा वकूब कळलाच, परंतु या लेखनाने राजाभाऊंमध्ये या नव्या माध्यमावरील लेखनशैलीसाठी आवश्यक तो विश्वास निर्माण झाला.

१९४१ मध्ये 'सारस्वत'साठी राजाभाऊंनी लिहिलेल्या 'कोणा कशी कळावी' नाट्यगीताचे स्वतः संगीत देऊन ध्वनिमुद्रण करण्याचे तीन दशकांनंतर कुमार गंधर्वांसारख्या व्यक्तीला अप्रूप वाटावे, यातच सर्व आले.
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.