A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोणता मानूं चंद्रमा

कोणता मानू चंद्रमा
भूवरीचा कीं नभींचा?

बघुनि सखिमुख वाटे हृदयीं
चंद्र कशाला भूवरि येई
बघतां गगनीं चंद्र तिथेंही
वरितें मानस सुखद संभ्रमा

गगनीं रजनी भुवनीं रजनी
दिसतो चंद्रहि दोन्हि ठिकाणीं
एकावरि ये कलंक दिसुनी
दावि दुजा निजनयन-नीलिमा

एक फुलवितो कमलविशेषा
दुजा फुलवि मम मानसकोषा
एक करितसें कीं तमनाशा
नाशी दुसरा मम विरहतमा

संधिकाल जंव चुंबी एका
चढते लाली त्वरित तन्मुखा
दुज्यास अधरीं अधर जुळविता
खुले कपोलीं प्रणय-रक्तिमा

नभ-मुकुरिं कीं सखि बघतसे
बिंब मुखाचें तिथें पडतसे
जन-नयनां तें चंद्र गमतसे
पसरि तेंच कां भुवनीं सुषमा

चंद्र कोणता वदन कोणतें?
शशांकमुख कीं मुखशशांक तें?
निवडतील निवडोत जाणते
मानी परि मन सुखद संभ्रमा
कपोल - गाल.
जंवर - जोपर्यंत.
मुकुर - आरसा.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
सुषमा - मोठी शोभा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.