A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
क्षण आला भाग्याचा

क्षण आला भाग्याचा ।
आला सौख्याचा ॥

हांसत मोदें नाचत नादें ।
हें मन माझें ।
मंगल दिन हा ।
आला सौख्याचा ॥

प्रेममया जीवनिं या ।
जरि राहिलें रंगुनिया ।
आला उदयाला बहराला ।
मंगल दिन हा ।
आला सौख्याचा ॥
नवताम्‌ उपैति - प्रतिभावान मास्तर कृष्णराव !

पुणे विद्यापिठात शिकत असताना आजोबांना संगीत नाटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती. बालगंधर्वांचा सुवर्णकाळ पाहिलेले आजोबा संगीत रंगभूमीवरील नवयुगाने फारसे प्रभावित झालेले नव्हते. १९८०च्या दशकाची ती सुरुवात होती. परंपरागत संगीत नाट्यकलाकारांचा तो सरता काळ होता. आजोबा किर्लोस्कर-देवल-खाडिलकर ते जास्तीत जास्त अत्रे-रांगणेकर यांतच रमत. वयोवृद्ध विश्वनाथ बागुल सं. सौभद्रमधील 'कृष्ण' करत असत. आजोबांच्या मते, नाट्यसंगीत कृष्णामास्तरांबरोबर संपले. 'पांडवा सम्राटपदाला', 'अवघाचि संसार सुखाचा करीन', 'धांव घाली विठू आतां', 'क्षण आला भाग्याचा', 'बोला अमृत बोला' ही पदे ऐकताना आजोबा डोळे मिटून तल्लीन होऊन जात असत.

तेव्हा माझ्यासाठी समोर येईल ते मराठी गाणं ऐकणं, खूप आणि सतत ऐकत राहणं एवढंच होतं. 'आठवणीतली गाणी' संकेतस्थळ सुरू केल्यानंतर जशी मी या पदांच्या खोलात जायला लागले, तसे कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तरांचे नाव, कारकीर्द, क्षमता, आवाका, त्यांचा चौफेर वावर, त्या वावरातील सहजता.. असे सगळे समोर येत गेले. सवाई गंधर्व, पं.भास्करबुवा बखले यांच्या या शिष्याचा कार्यकाल सुरू झाला त्या काळात संगीत नाटकात संगीत अधिक आणि नाट्य (अभिनय) कमी असा प्रकार होता. ते 'नाट्यनिकेतन'च्या 'कुलवधू', 'कोणे एके काळी' या कलाकृतींकडे येतायेता नाटकाचे सुबद्ध सादरीकरण, संगीत आणि नाट्याचा समतोल, असे येत गेले. हा बदल, हे स्थित्यंतर मास्तरांनी ज्या सहजतेने आणि समर्थपणे स्वीकारले, त्यातून काळानुरूप बदल केला म्हणून 'संगीत' कमी होत नाही, हेच सिद्ध केलं. संगीत रंगभूमीवर संगीतकार, गायक आणि नट - असा तीनही भूमिकांमधून वावर मास्तरांनी केला.

आपल्या गुरूबरोबर मैफिली करीत फिरत असताना, स्वातंत्र्यपूर्व काळातील अखंड भारतातील अनेकविध प्रकारचं संगीत ते ऐकत गेले, टीपत गेले. पंजाबी, कर्नाटकी, उत्तर हिंदुस्थानी, बंगाली, गुजराथी ते अस्सल मराठी मातीतलं लोकसंगीत देखील त्यांत समाविष्ट होतं. यांतून मास्तरांचे चौफेर व्यक्तिमत्व घडले असावे. स्वत:च्या संगीत जलशांच्या दौर्‍यांतील मैफिलीत ते दुर्मीळ राग, अनवट राग, जोड राग, ठुमरी, ख्याल, संत रचना, स्वनिर्मित चिजा, ते थेट आपण संगीत दिलेल्या चित्रपटातील गीते, असे सर्व संगीत प्रकार सादर करीत. कुठलेच संगीत त्यांना वर्ज्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना दर्दी आणि गर्दी दोन्ही असे.

मैफल सादरीकरणाचे तंत्र त्यांना लहानपणीच त्यांचे गुरू पं. भास्करबुवा बखले यांनी शिकवले. सादरीकरणात रंजकता आणि गतिमानता असायला हवी. इथे रसिक श्रोत्याचा, बालगंधर्वांच्या 'मायबापाचा' जोहार झाला पाहिजे, त्यास प्रणिपात केला पाहिजे. 'जोहार मायबाप जोहार' या स्वत: संगीत दिलेल्या पदास मास्तर आणि आपणच गायलेल्या ’संत कान्होपात्रा’तील या रचनेस बालगंधर्व, हे दोघेही रसिकजनांत मायबाप बघत सर्वार्थाने जगले, असे म्हणता येईल.

मास्तर कृष्णरावांनी संगीतावर मुबलक लिखाण केलं आहे. 'रागसंग्रहमाला' या ग्रंथाचे सात खंड आहेत. आपल्या गुरूने, पं.भास्करबुवांनी 'पुणे भारत गायन समाज' या हिंदुस्थानी संगीताच्या प्रसारार्थ सुरू केलेल्या संस्थेसाठी त्यांनी हे लिखाण केले होते. आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तरांनी 'संपूर्ण बुद्धवंदना' सांगीतिक मीटरमध्ये बसवली. बाबासाहेबांनी त्याची मास्तरांच्या आवाजात ध्वनीमुद्रिका काढली. उच्चारण निर्दोष व्हावे यासाठी मा. कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला. याची माहिती मी खुद्द वीणा चिटको या मास्तरांच्या सुविद्य कन्येकडून ऐकली आहे आणि त्यांनी या आठवणींविषयी एक लेखदेखील लिहिला आहे. वीणा चिटको यांनी स्वतः भावसंगीत निर्मिती केली आहे. त्या मराठीतील पहिल्या स्‍त्री भावसंगीतकार होत्या. राष्ट्रवादी मास्तरांनी 'मराठी असे आमुची मायबोली’ आणि 'वन्‍दे मातरम्‌’ (राग: झिंझोटी) या गीतांस चाली देऊन आपल्या मराठी भाषेवरील प्रेमाचा आणि देशभक्तीचा उद्‌घोष केला आहे. 'वन्‍दे मातरम्‌’ हे भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून मास्तरांनी दिलेला सांगीतिक लढा तर सर्वश्रुत आहे.

मा. कृष्णरावांनी संगीत दिलेलं चित्रपट संगीत हा एक स्वतंत्रपणे अभ्यासण्याचा विषय आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपट संगीतावर मास्तरांनी छाप पाडली ती आपल्या प्रयोगशील सिद्धहस्ततेमुळे! 'प्रभात फिल्म कंपनी'चे 'धर्मात्मा', 'गोपालकृष्ण', 'माणूस', 'शेजारी', 'अमरज्योती', 'वहाँ'... 'गंधर्व नाटक मंडळी'चा 'साध्वी मीराबाई'.. 'राजकमल कलामंदिर'चा 'भक्तीचा मळा'.. 'माणिक चित्र संस्थे'चा 'कीचकवध', इत्यादी. त्यातील मोजक्या सदाबहार गीतांचा उल्लेख हा करावाच लागेल... 'आता कशाला उद्याची बात', 'धुंद मधुमती रात रे' आणि अर्थातच, 'लख लख चंदेरी'. चित्रीकरण, ध्वनीमुद्रण, संगीत रचना अशा अनेक कारणांनी गाजलेलं ’लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ ह्या शेजारीतील गीताने iconic song ची उंची गाठली आहे. ते एकूण मराठी चित्रपटसृष्टीचं 'ध्वजगीत' झाले आहे, असे म्हणता येईल.

'आचार्य अत्रे यांची चित्रपट गीते' या पुस्तकात लेखक श्री. गंगाधर महाम्बरे यांनी 'अत्रे पिक्चर्स'च्या 'वसंतसेना' या मास्तरांनी संगीत दिलेल्या चित्रपटाविषयी भरपूर आणि माहितीपूर्ण लिहिलं आहे. "मी चांगल्या ’चाली’चा संगीत दिग्दर्शक आहे." (मास्तर निर्व्यसनी होते), असे म्हणत एकदा मास्तरांनी सवयीप्रमाणे टाळी घेण्यासाठी आचार्य अत्र्यांच्या पुढे हात नेला, तेव्हा अत्रे म्हणाले, "आता तुम्हाला 'चाळी' नाहीत तर महाल सजवायचे आहेत." या चित्रपटासाठी अत्र्यांनी मास्तरांना 'प्रभात'च्या सहाशे रुपये पगारावरून 'अत्रे पिक्चर्स'मध्ये थेट बाराशे रुपये पगारावर आणले. शब्द, सूर, नृत्य, चित्र यांचा मनोहर संगम साधणारी ’कमलनृत्य’ ही या चित्रपटातील एक अभिजात कलाकृती होती. याच पुस्तकातील लेखात श्री.गंगाधर महांबरे पुढे लिहितात, "मा. कृष्णराव, या आपल्या संगीतातील गुरूबद्दल त्यांची कन्या संगीतकार वीणा चिटको आणि मी एकदा वसंत देसाई यांच्याशी गप्पा मारत असताना देसायांनी सांगितले की संपूर्ण भारतात केवळ आलापांनी आणि नोटेशनने कोणतेही वाद्य न वाजवता आपल्या सहाय्यकांना चाल 'सांगणारा' एकच दिग्दर्शक होऊन गेला आणि तो दिग्दर्शक म्हणजे मा. कृष्णराव!"

मास्तरांना करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी 'संगीत कलानिधी' ही पदवी बहाल केली होती. कलानिधी म्हणजे चंद्र. त्यांच्या संगीत रचनांचे चांदणे गेली कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर झिरपत आहे.

पु. ल. देशपांडे यांनी मास्तरांच्या कलेचा गौरव करताना म्हटलं आहे, " 'नवताम्‌ उपैति' हे प्रतिभेचे लक्षण आहे आणि हे मास्तरांच्या गाण्यांमध्ये सतत अनुभवास येते. याचं कारण प्रतिभेचे जे अलौकिक देणं आहे, ते मास्तरांना मिळालं आहे."

क्षणे क्षणे यन्नवतामुपैति तदेव रूपं रमणीयतायाः ।
(संस्कृत कवी माघ: रचित शिशुपालवधम्, चतुर्थः सर्गः)
अर्थ - जे प्रत्येक क्षणी नवीन रूप धारण करतं, ते रमणीय असते.
म्हणून नवनिर्माणतेचं कोंदण लाभलेलं मास्तरांचं रमणीय संगीत कालजयी ठरलं आहे.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.