A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुई कुई चाक बोलतंय

कुई कुई कुई कुई चाक बोलतंय मोट चालली मळ्यामंदी
झुळ झुळ झुळ झुळ पाणी पळतंय नागावाणी पाटामंदी

भिर भिर भिर भिर फिरतंय वारं
सळ सळ करतंय शिवार सारं
चम चम चम चम मोती चमकती धाटावरनं कणसामंदी

भर भर येतील रानपाखरं
लुटतील दौलत चिमणा चोर
गर गर गोफण फिरवीत राहीन माळावर मी थाटामंदी

आहा हाहा हाहा हाहा कुकुकूकू
आपण दोघं घुमवत राहू
करू काढणी धाट मोडणी मोती साठवू खळ्यामंदी

लई सुखाची तुझीच राई
घरी लक्ष्मी येईल बाई
धनत्तराची बाळं आपण खेळू नांदू सुखामंदी
गोफण - शेतातील धान्यावरील पक्षी उडवण्यासाठी दगड मारताना वापरावयाचे उपकरण.
धनत्तर - श्रीमंत.
धाटं - ज्वारी, बाजरी, मका, इ. पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेला कणिसाखालील भाग.
शिवार - शेत.