A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझे नि माझे नाते काय

तुझे नि माझे नाते काय?

तू देणारी, मी घेणारा
मी घेणारी, तू देणारा
कधी न कळते, रूप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
अपुल्या मधले फरक कोणते?
अन्‌ अपुल्यातून समान काय?

मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल
सुंदर स्वप्‍ने पडत असतील, पण कुशीवर वळेल, उसासेल
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल

तिच्यासमोरही तेच ढग, जे माझ्यासमोर
तिच्यासमोरही तेच धुकं, जे माझ्यासमोर
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे, अन्‌ पूर्णविरामही !
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल
मला खात्री आहे तिला झोप आली नसेल

सुखदु:खाची होता वृष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविण सहजची घडते, समेस येता टाळी पडते !
कुठल्या जन्मांची लय जुळते?
या मात्रांचे गणित काय?

बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र. एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात माती आहे आमच्या दोघांच्या, अजूनही !
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या, अजूनही !
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठावर एकमेकांची भाषा आहे
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी तीही जागीच असेल,
मला खात्री आहे तिला झोप आली नसेल

नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव !
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्‍याचा पाय?
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - सांग सख्या रे
गीत प्रकार - कविता
सायास - विषेष आयास (कष्ट), श्रम.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सलील कुलकर्णी, संदीप खरे