A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुत्‍ना थमाल ले थमाल

कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासि जातो भाई ॥१॥

तुम्ही थोलल्या पातलाचे लेक ।
तुह्मांमधले मी गलीब आहे एक ।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख ।
किती धावूं ले कातां लागला पायी ॥२॥

काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धवली गाय पलाली ।
मदला देखुनी तो गवली हाका माली ।
काली कांबली हिलुनि घेतली थाली ॥३॥

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥
'कुत्‍ना थमाल रे थमाल आपुल्या गाई' हा बोबडा बोल श्रीनामदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान हळुवारपणे महाराष्ट्राच्या अंत:करणात गेली साडेसहाशे वर्षे विशद करीत आहे.

सर्व गाई म्हणजे इंद्रिय-ग्राम. कुलाच्या म्हणजे गोविंदाच्या हाती सुपूर्त करून 'आपुल्या घराला' म्हणजे निजस्थानाकडे स्वस्वरूपाकडे जाण्यास नामदेव सदैव सिद्ध आहेत व जीवमात्राने असेच सदैव सिद्ध असावे असा ऊर्जस्वल संदेश नामदेवांनी महाराष्ट्राला निवेदिला आहे.

महाराष्ट्रीयांच्या श्रुतिप्रांगणांत 'कुत्‍ना थमाल रे' हा बोबडा बोल आज साडेसहाशे वर्षे बागडत आहे; त्याचा लक्ष्यार्थहि आत्मसात करणे हे आपले व सर्वांचे, आजचे आणि आकल्पपर्यंतचे, भव्य कर्तव्य नाही काय?

मूळ रचना-

कुत्‍ना थमाल रे थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपल्या घलासि जातो भाई ॥१॥

तुम्ही थोलल्या पातलाचे लोक ।
तुम्हांमधी ले मी गलीब आहे एक ।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख ।
किती मी धावूं ले कांता लागला पायी ॥२॥

काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धवली गाय पलाली ।
मदला देखुनी तो गवली हाका माली ।
काली कांबली हिलुनि घेतली थाली ॥३॥

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सर्ल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणून थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥

कृष्ण म्हणे रे 'उगा राहि बोबड्या गा ।
तुझ्या गायी रे मीच वळवितो गड्या ।
नाहितर धाडिन रे गोपाळांच्या जोड्या' ।
नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही ॥५॥

(संपादित)

महर्षी न्यायरत्‍न धुंडीशास्‍त्री (धुं. गो.) विनोद
सौजन्य- www.maharshivinod.org
(Referenced page was accessed on 21 April 2017)