A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाडके कौसल्ये राणी

उदास कां तूं? आवर वेडे, नयनांतिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी

वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी

ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेध तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी."
विचार माझा मला जागवी, आलें हें ध्यानीं

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"

आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्‍निग्धमधुर कोणी

"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवता वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे"
"मान्य" - म्हणालों - "गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही

अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
त्याच्या करवीं करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं

सरयूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्‍न करूं गे, अंती अवभृत स्‍नान करूं
ईप्सित तें तो देइल अग्‍नी, अनंत हातांनीं
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - देस
गीत प्रकार - गीतरामायण, नयनांच्या कोंदणी, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २२/४/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- बबनराव नावडीकर.
अवभृत - यज्ञसमाप्‍तीच्या वेळेस करावयचे स्‍नान.
अश्व - घोडा.
अश्वमेध - चक्रवर्ती राजाने करावयाचा यज्ञ.
इष्टी - यज्ञ.
ईप्‍सित - इष्टित, इच्छित.
ऋष्यशृंग - एक ऋषि. यांच्या मस्तकावर ’ऋष्य’ जातीच्या मृगाचे शिंग होते.
कश्यप - एक ऋषि.
गुर्वाज्ञा - गुरुने दिलेली आज्ञा.
जाबालि - एक नास्तिकवादी ऋषि.
धूम - धूर.
नवनीत - लोणी.
मथणे - मंथन करणे, घुसळणे.
वसिष्ट - एक प्रख्यात ब्रह्मर्षि.
स्‍निग्ध - प्रेमळ.
सांगता - पूर्णता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण