A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाल टांगा घेऊन आला

लाल टांगा घेऊन आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, नेरे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
गीत - ना. गो. शुक्ल
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - बालगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊ या
मामाच्या गावाला जाऊ या

हे गाणं शंभर वेळा म्हटलं असेल तेव्हा. म्हणजे गाण्यांच्या भेंड्या हिरीरीनं खेळण्याच्या वयात. पण मला आजोळ नव्हतं. वडलांच्या ज्या मित्रांना आम्ही मुलं मामा म्हणत आलो, ते मागचा पुढचा पाश नसलेले ब्रह्मचारी. मामाही पुण्यातच रहात होते आणि चार-सहा दिवसांनी घरी येणारेच होते. त्यामुळे त्यांच्या गावाची कल्पना कधी मनात आलीच नाही.
माझ्या वडिलांच्या आणि आत्याच्या मनात मात्र त्यांचं आजोळ गाव कायम होतं. अजूनही आहे. कितीतरी वेळा सहज म्हणून आणि सुखदु:खांच्या गोष्टी करताना अगदी आतड्यापासून ती दोघं भावंडं गावाबद्दल बोलतात. गावाची ओढ काय असते ते मला त्यांच्या मधून सतत जाणवत राहतं. पण ती ओढ त्यांची असते; माझी नव्हे.

पहिलीच्या वर्गात जाण्याआधीच्या शाळेत असताना माझा भाचा शाळेत शिकवलेलं एक गाणं म्हणायचा.
लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लललल लललल ला
लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
लाला लाला नेरे मला माझ्या गावाला

'ल'च्या अनुप्रासाची आणि लाल रंगाच्या आवर्तनाची गंमत होती त्यात. पण मला ते गाणं आणखी एका कारणानं आवडायचं. त्या गाण्यातून एक छान वाट दूर निघत असायची. लाल चुटुक टांगा घेऊन आलेला लाला टांगेवाला आणि लाल परकर नेसून आलेली चिमुरडी लीला यांच्यातला तो संवाद साधाच.
पण प्रश्‍न पडायचा, की लीला त्याला तिच्या गावाला घेऊन जाण्यासाठी सांगतेय, म्हणजे ही आली आहे कुठे? कुठे कोण जाणे. पण तिला तिच्या गावाला जायचंय. कुठे आहे तिचं गाव ! कुठे कोण जाणे? काय त्याचं नाव आहे, ते कसं, कुठे वसलं आहे? काहीच माहीत नाही. हे म्हणजे अगदी माझ्यासारखंच, की कल्पनेला कितीही मोकळं सोडता यायचं. लाल टांगा लीलाला घेऊन गावाच्या वाटेनं टपटप जात रहायचा आणि लाला टांगेवाला मस्त गाणं गात रहायचा.

लाललाल परकर नेसून आलेल्या लहानग्या लीलाला किती मजा वाटत असणार ! ती म्हणाली काय आणि लाला टांगेवाला तिला घेऊन तिच्या गावाकडे निघाला काय. मजाच सगळी ! शिवाय लाला गाणंही गातोय. आपल्या गावाला पोचेपर्यंत सोबतीला गाणं असणं ही गोष्टच किती सुंदर आहे !

कुणास ठाऊक, लीला मोठी झाल्यावर तिच्या बाळडोळ्यांनी पाहिलं ते तिचं गाव तसंच राहिलं असेल की नसेल ! कदाचित ते पार बदलूनही गेलं असेल. कुणास ठाऊक तिचं गाव 'तिचं' राहिलं असेल की नसेल ! कदाचित ते तिची ओळखही विसरलं असेल.

..घरा मागून वाहणार्‍या नदीचा लहानसा घाट, कोपर्‍यावरून वळणारा चढाचा रस्ता, समोरच्या वाड्यात ओटीवर हलणारा झोपाळा, शमीचं मोठ्ठं झाड असलेलं गणपतीचं जुनं देऊळ, पुढच्या गल्लीतलं कासाराचं झगमगत दुकान, घरगुती आस्थेनं विचारपूस करणारे बेकरीतले काका - असलं काहीतरी अगदी तिचंच असं शिल्लक उरलं असेल? की तिला वगळून मुजोर वेगानं पुढे जाणार्‍या आयुष्यानं तिचं गाव ओळखीच्या चेहर्‍यांसकट सहज गिळलं असेल आणि तिथे एक नवं भलं बुरं, पण तिचं अजिबात नसलेलं गाव रचून ठेवलं असेल? तसं असेल तर मोठ्या लीलाच्या मनात लहानगी लीला आक्रोश मांडून म्हणत असेल,
'लाला लाला ने रे मला 'माझ्या' गावाला !'

कवींनी कवितेत धरून ठेवलेला आपला गाव पुढे कितीतरी वेळा दिसत राहिला. 'निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव' असं सांगत आपला गाव, गावातलं दुर्गेचं देऊळ, तिथे सगळ्या गावात फुलणार्‍या जाईनं देऊळ भरून टाकणारा 'जायांचा उत्सव' गावाचं आणि गावकर्‍यांचं साधंसं आतिथ्य, याचं कौतुक करणारी बोरकरांची कविता भेटली. 'काट्याकुट्याचा तुडवित रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता' असा आग्रह करणारी इंद्रजित भालेरावची कविताही भेटली. महानगराचं भलं बुरं रुप जबरदस्त संवेदनशीलतेनं किती जणांनी कवितेत दाखवलं.

पण या सगळ्या कवितांना मागे सारून एक निराळीच कविता सारखी पुढे येत राहिली. लीलाच्या कवितेसारखीच आहे ती. अर्थ पुरा उलगडल्याचं समाधान कधी मिळत नाही. ती आरती प्रभूंची एक गझल आहे. 'जाईन दूर गावा'
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

कवितेतलं हे गाव कवीचं नव्हे. कारण त्याचं घरदार टाकून त्याला दूर गावी जायचं आहे. एरवी एखाद्या गावाला निघालो तर आपलं घरदार आपल्या सोबतच असतं. कधी मिळूनच प्रवास असतो आणि कधी मागे वाट पाहणारं घर असतं. ते दूर गावीही आपली सोबत करतं. आपल्याला परत बोलावत राहतं.
इथे मात्र भाषा आहे ती घरदार टाकण्याची. जे आपलं आहे, आतड्याचं आहे ते सगळं बाजूला सारण्याची. आपल्या अस्तित्वाला, आपल्या जगण्याला अर्थ देणार्‍या सगळ्या आपल्याशा गोष्टींना टाकून देण्याची.
सोपं नाही तसं करणं. कारण घरदार टाकणं म्हणजे स्थिरता सोडणं, निश्चितता सोडणं, निश्चिंतता सोडणं, विसावा सोडणं, आधार आणि सावलीही सोडणं. जे जे नको ते ते सोडतोच बहुधा, पण जे जे हवं, ते तेही सोडणं.

पण त्या दूरच्या गावाची ओढच अशी आहे की सगळं सोडायलाही तयार व्हावं. तसं सोडणं जमलं तर कदाचित त्या गावाला पोहचूही शकतो आपण. तो गाव भौगोलिक अंतरानं दूरचा नाहीच आहे खरं तर. दूरचा आहे तो आतल्या प्रवासाचा विचार करून.

पाण्यानं ओंजळ भरून घेताना हातात मासोळीची सळसळती चमचम यावी, तसा शब्दापुढे शब्द ठेवत जाताना त्यातून एखादी उत्कट आणि परम अर्थाची झळाळी सरकून जावी हे कवीचं भाग्य.
पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा

माहीत असतात आरोह-अवरोह. तालाशी खेळणं माहीत असतं. रागाच्या खुणा ओळखीच्या असतात, पण कधीतरी चुकून अकस्मात तारांवर हात पडतो आणि गंधाराची विराट पोकळी तिला उघडावा तशी दिसू लागते.
तारांवरी पाडावा केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

किती विलक्षण असेल तो अनुभव ! आपल्या जवळच्या सगळ्या क्षुल्लक, सामान्य, निर्थक गोष्टींना एकदम सार्थकाचाच स्पर्श होतो. जे तो पर्यंत कधी दिसलं नव्हतं, ऐकलं नव्हतं. चाखलं नव्हतं. ते पाहण्याचा, ऐकण्याचा, भोगण्याचा क्षण अगदी अचानकच सामोरा येतो. त्या क्षणाच्या गावाची गोष्ट आरती प्रभुंनी केली आहे. जे मागे टाकून आपण त्या क्षणापाशी-त्या गावापाशी आलो, ते आपल्याला प्रिय आणि मौल्यवान होतं खरं, पण त्याहून कितीतरी मोठं, कितीतरी मोलाचं असं मिळून जाण्याचा तो अनुभव आहे.

खरं तर प्रत्येक सच्च्या कवीची, नव्हे सच्च्या कलावंताची, साधकाची संवेदनशील अशा प्रत्येकाचीच ही आतली तळमळ असते की 'ह्या इथल्या' पाशातून मोकळं होता यावं आणि 'त्या तिथल्याचा' मुक्काम आपलासा करता यावा. हे जमणं इतकं अवघड, की जमलं तर स्वत:चाच स्वत:ला हेवा वाटावा. आणि मग तो हेवाही केवढा हवासा म्हणायला हवा !
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा
(संपादित)

अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (१४ फेब्रुवारी २००९)
(Referenced page was accessed on 11 April 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.