A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लवलव करी पातं

लवलव करी पातं :
डोळं नाही थार्‍याला;
एकटक पाहूं कसं
लुकलुक तार्‍याला?

चव चव गेली सारी,
जोर नाही वार्‍याला;
सुटं सुटं झालं मन :
धरूं कसं पार्‍याला?

कुणी कुणी नाही आलं,
फडफड राव्याची;
रुणझुण हवा का ही?
गाय उठे दाव्याची.

तटतट करी चोळी,
तूट तूट गाठीचीं;
उंबर्‍याशी जागी आहे
पारूबाई साठीची.
दावण - गुरे बांधण्याची लांब दोरी.
रावा - पोपट.
लवलव - आंदोलन, झुलणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.