A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मध्यरात्रीला पडे तिच्या

मध्यरात्रीला पडे तिच्या दारावरती थाप
नवथर जीवाचा झाला भीतीने थरकाप

धडधडत्या वक्षावरती ठेउनी उजवा हात
कानोसा घेऊ लागे तशीच अंधारात

परिचित आली तोच तिच्या कानावरती शीळ
सांगे की या राधेचा दारी उभा घननीळ !

भीतीचा लवलेश नुरे त्या सुंदर नयनांत
भीतीवरती प्रीती ही अशीच करिते मात

माथ्यावरुनी सावरुनी पदर घेतला नीट
दार उघडुनी बाहेरी उभी ठाकली धीट

परिचित बाहूंचा पडला विळखा तो देहास
आणि मिळाले उभयांचे श्वासांमध्ये श्वास

अधीर ओठांची झाली क्षण थरथरती भेट
हृदयीचे गुज खोलवरी जावुनी भिडले थेट

आलिंगन ते शिथिल परि झाले दुज्या क्षणास
भवतीच्या जगताची हो जाणिव धुंद मनास !

अंधारातच गेला तो शूर तिचा सरदार
खिन्‍न मनाने परत फिरे ही चंद्राची कोर !

कळ दु:खाची तीव्र उठे तिच्या काळजातून
गालावरुनी ओघळली आणि आसवे ऊन

मंद समीरण भवताली गाई करुणा-गीत
अन्य कुणा नच कळली ती अंधारातली भेट !
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
नवथर - नवीन.
समीरण - वायू.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.