A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज आवडले हे गाव

मज आवडले हे गाव!

नदी वाहती, घाट उतरते
तीरावरती गोधन चरते
हिरवी मळई जळा चुंबिते
इकडुन तिकडे, तिकडून इकडे खेपा करिते नाव
मज आवडले हे गाव!

चहू बाजूला निळसर डोंगर
मधे थिटुकले खेडे सुंदर
निंब, बाभळी, अंबा, उंबर
हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी करिती शीतळ छांव
मज आवडले हे गाव!

घरे ठेंगणी, वळत्या वाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
राउळशिखरी उंच बावटा
भगव्या रंगे जगास सांगे वंशकुळाचे नाव
मज आवडले हे गाव!
चव्हाटा - अड्डा, चार लोक जमून बसण्याची जागा.
चावडी - पंचायत कचेरी.
बावटा - ध्वज.
मळई - नदीच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या गाळावरील शेती.
राऊळ - देऊळ.