A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज सांग अवस्था दूता

मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची

हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं?

बसलेत काय ते लावुन कर कर्मातें?
विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें?
करितात अजून ना कर्तव्यें नृपतीचीं?

सोडिले नाहिं ना अजून तयांनीं धीरा?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची?

इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे?
विसरले थोरवी काय प्रभु यत्‍नांची?

का मलाच विसरुन गेले माझे स्वामी?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची?

करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी?
धाडील भरत ना सैन्य, पदाति, वाजी?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची?

का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची?

त्या स्वर्णघडीची हो‌इन का मी साक्षी?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं?
वळतील पाउलें कधी इथें नाथांचीं?

जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधी का होइल भेट तयांची?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भीमपलास
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २९/१२/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.
नृपति - राजा.
पदाति - पायदळातला शिपाई.
पृष्ट(ष्ठ) - पाठ.
भाता - बाण ठेवण्याची पिशवी.
मुद्रिका - अंगठी.
वैदेही - सीता. विदेह (जनक) याची कन्या.
वाजी - अश्व.
स्वये - स्वत:

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण