आता तरी येशील का?
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशील का?
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा,
सूर तू होशील का?
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का?
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | राम फाटक |
स्वराविष्कार | - | ∙ सुधीर फडके ∙ पं. भीमसेन जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
मंथर | - | मंद, हळू चालणारा. |
याच सुमारास माझ्या मनात एक प्रयोग करून पहावा असं आलं. भीमसेन जोशींसारख्या एका बड्या ख्याल गायकाकडून एखादं दमदार भावगीत गाऊन घेतलं तर तेही चांगलं वठायला काय हरकत आहे? त्या गायकाचा आवाज, त्याची पद्धत, त्याची विचारधारा वगैरे गोष्टींचा अंदाज घेऊन स्वररचना केली, तर यश यायला हरकत नाही, असं मला वाटलं. प्रयत्न करून पाह्यला प्रत्यवाय नव्हता. पंडितजींचा होकार मात्र यायला हवा होता. मी फोन केला. आणि कुठलेही आढेवेढे न घेता 'गातो' म्हणाले. या तर्हेचं प्रपोझल पुढे ठेवलं, तर केंद्राधिकारी नाही म्हणणार नाहीत याची खात्री होती. मी कामाला लागलो.
विशिष्ट गोष्टी लक्षात ठेऊन गाणं करायचं होतं. मग एखादा साजेसा विषय घेऊन त्यावर गाणं लिहून घ्यावं, असं मनात आलं. मी विषय निवडला तो असा- एखादा फार मोठा कलावंत, की ज्याला कीर्ती, पैसे किंबहुना सगळी ऐहिक वैभवे मिळाली असतानाही व्यसनाधीन होतो, का? तिर्हाईताच्या दृष्टीने त्याला सगळं मिळालं आहे हे खरं. पण त्याला जे काही पाहिजे आहे, की पाहिजे होतं ते मिळालेलं आहे का? कदाचित नसेलही. ती त्रुटी त्याला सारखी जाणवत असेल. त्याची त्याला खंत असेल. यातना असतील आणि त्या विसरण्याकरिता तो व्यसनाधीन होत असेल. मनात अशी काहीशी कल्पना घोळत होती.
स्टुडिओत जाऊन पेटी घेऊन बसावं, काही धून सुचते का बघायला, असं वाटलं, इतक्यात सुधीर मोघे ऑफिसात टपकला. सोन्याहून पिवळं झालं. एका प्रतिभावंत कवीला बरोबर घेऊन चाल करायची संधी आली. पाच-दहा मिनिटं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर मी त्याला माझ्या डोक्यात काय चाललं आहे, हे सांगितलं आणि म्हटलं, "चल जरा, स्टुडिओत जाऊन काहीतरी काम करू. मूड आहे. तुला वेळ आहे ना?" तो "हो" म्हणाल्यावर आम्ही स्टुडिओत गेलो. जाताजाता त्याला विषय आणखी थोडा समजावून सांगितला. स्टुडिओत गेल्यावर पेटी घेतली आणि गुणगुणायला लागलो. कवी आणि कंपोझर, दोघांच्याही मनात विषय ठसला होता. मी स्वर धून आठवू लागलो. तो शब्द धून आठवत असेल. गुणगुणता गुणगुणता मला एक तोंड, मुखडा सुचला. तो मी पुन्हापुन्हा कुठल्यातरी शब्दांत गुंफून म्हणू लागलो. ते शब्द होते, "सखि तारका मंदावल्या." त्या शब्दांत सुधीरला विषय गवसल्याचं दिसलं. तो म्हणाला, "असंच म्हणत रहा, फक्त 'सखि तारका मंदावल्या' ऐवजी 'सखि मंद झाल्या तारका' म्हणा.
मला प्रियकराची प्रतीक्षा दिसते आहे. तो प्रतीक्षा करून थकला आहे, काहीसा व्यथित झालेला आहे, आतुर झाला आहे आणि म्हणतो आहे, 'सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?' काही मिनिटांतच पूर्ण मुखडा तयार झाला, छान वाटलं दोघांनाही. काही वेळ आम्ही दोघेही ते शब्द आणि ते स्वर आळवीत होतो.
त्याला जास्त वेळ माझ्याबरोबर बसणं शक्य नव्हते. आम्ही दोघेही उठलो. सुधीर म्हणाला, "मला आशयाचा उत्तम अंदाज आला आहे. उद्या पूर्ण कविता घेऊन येतो." आणि खरंच दुसरे दिवशी तो पूर्ण कविता घेऊन आला. उत्कृष्ट काव्य होतं ते. उर्दू शायरीच्या धाटणीचं. सबंध दिवस इतर कार्य करीत असताना सुद्धा डोक्यात तेच घोळत होतं. दुपारी काम संपल्यावर स्टुडिओत जाऊन चाल करीत बसलो. योग चांगला असावा, अंतरे सुचत गेले, आणि आज मनासारखी चाल लागली या आनंदात डुंबतच घरी गेलो.
यथावकाश गाणं पंडितजींना सांगितलं आणि ’स्वरचित्रा’करिता ध्वनिमुद्रितही केलं. काव्य, चाल, आणि गायन सगळीच भट्टी जमली होती. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. काही अतिशय लोकप्रिय ’स्वरचित्रां’पैकी ते एक ठरलं. पण हे गीत महाराष्ट्रात घरोघरी पोहोचलं ते काही वर्षांनी.
१९७७ च्या ऑक्टोबर अखेर मी निवृत्त झालो. माझ्या स्वरयात्रेतला एक महत्त्वाचा टप्पा पार झाला. एक संपन्न कालखंड संपला. पण माझी स्वरयात्रा मात्र संपली नाही. ती चालूच राहिली. मार्ग बदलला इतकंच. संगीत क्षेत्रात मी स्वतंत्रपणे काम करीत राहिलो.
या काळात मला टी. व्ही. वर 'शब्दांच्या पलीकडे' हा कार्यक्रम करायचा होता. सुधीर मोघेची तीन गाणी होती. एक होतं माडगूळकरांचं. गायक-गायिका होते डॉ. उषा वाघ, उत्तरा केळकर आणि सुधीर फडके.
माडगूळकरांचं 'श्रावणातल्या त्या रात्रीची शपथ घालते तुला.. नकोस टाकून जाऊ जिवलगा, अशी एकटी मला..' हे गीत मला आवडलं होतं. पण त्या वेळी तरी त्या गाण्याचे पूर्ण शब्द माझ्याकडे नव्हते. सुधीरची अनेक गीते पाठ असतात. पण त्यालाही हे गाणं माहीत नव्हतं पूर्ण. शांताबाई शेळक्यांना नक्की माहीत असतील शब्द, असं तो म्हणाला आणि आम्ही त्यांना लगेच फोन केला. भेटल्या आणि अहो आश्चर्यम् ! त्यांनी संपूर्ण गाणं फोनवरून सांगितलं. सुधीरने उतरून घेतलं. त्याच्याच हस्ताक्षरातलं ते गाणं आजही माझ्या वहीत आहे. चाल छान जमली आणि उत्तराने ते म्हटलंही उत्तम.
उषा वाघ यांनीही सुधीरच्या "नाहूनिया उभी मी" या गीताला चांगला न्याय दिला. ह्या गाण्यांच्या तालमी मुंबईलाच झाल्या.
याच वेळी श्रीधर फडके याने कलाकारांचं एक पिकनिक लोणावळा येथे घ्यायचं निश्चित केलं. तो एयर इंडियामध्ये अधिकारी असल्याने त्याला एयर इंडियाचं गेस्ट हाऊस अशा कामाकरिता मिळे. आम्ही दोन तीन वेळा तिथे जाऊन सहलीचा आनंद लुटलेला मला आठवतो. या वेळीही तो योग आला. बाबूजींनी त्यांच्या गाण्याच्या तालमी तिथेच करायचा बूट काढला. लोणावळ्यासारख्या रमणीय परिसरात आणि तरुण मंडळींच्या आनंदमयी सहवासात त्या सहजसुलभतेने रंगतील याची सर्वांनाच खात्री होती.
लोणावळ्याच्या त्या आनंदोत्सवात आम्ही सगळेच रंगलो होतो. खाणंपिणं, गप्पागोष्टी, गाणं बजावणं सगळंच तब्येतीत चालू होतं. मी आणि फडके तालमीला बसलो. सुधीर मोघे, श्रीकांत पारगावकर, अरुण नूलकर, अजित सोमण, अरुण काकतकर, उत्तरा केळकर, चित्रा फडके, श्रीधर सगळ्यांचा अवतीभोवती वावर होताच. 'दिसलीस तू फुलले ऋतू' या गाण्याची तालीम सुरू होती आणि कडव्याच्या शेवटच्या ओळीवर मी अडलो. जागा आठवत नव्हती. कारण ते गाणं स्वरबद्ध करून बरेच दिवस झाले होते. गाणं छान झालं होतं; त्यामुळे सुधीर मोघे आणि मंडळींना ते लक्षात असणार म्हणून मी भोवती बसलेल्या आमच्या तरुण मित्रांकडे पाहिलं. मी अडलेला दिसल्यावर शेजारी बसलेला श्रीकांत पारगावकर म्हणाला, "रामभाऊ बर्याच दिवसांपूर्वी तुम्ही हे गाणं स्वरबद्ध केलं होतं आणि आम्हाला ऐकवलं होतं. मलाही ते फार आवडलं होतं. मला त्या ओळीची चाल आठवते आहे. आठवते तशी सांगू का?" मी म्हटलं, "देव पावला, मला पुन्हा डोकं खाजवायला नको." त्याने ओळ म्हणून दाखविली, आणि अडलेली गाडी पुढे सुरू झाली. त्या गाण्याची तालीम पूर्णपणे पार पडली. बाबूजींना ते गाणं खूप आवडल्याचं दिसलं.
मग तालीम सुरू झाली 'सखि मंद झाल्या तारका' या गाण्याची आणि थोडा पेचप्रसंग निर्माण झाला. एका जागेबद्दल माझी आणि बाबूजींची मताभिन्नता झाली. निष्कारण वाद सुरू झाला. खरं म्हणजे, असं व्हायचं कारण नव्हतं. किती तरी दिवस आधी मी ते पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात पुणे आकाशवाणीच्या 'स्वरचित्र' या कार्यक्रमातून सादर केलं होतं आणि त्याला लोकप्रियताही खूप लाभली होती. बाबूजींना मी हे परोपरीने सांगत होतो. तरीही त्यांना ते पटत नव्हतं. ते आग्रही वाटले. तरुण मंडळी बेचैन झाली. विशेषतः सुधीर मोघे. याचं कारण त्याच्या ह्या गाण्याला फडके यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भावगीत गायकाचा स्वर लाभणार होता.
वातावरण जास्त तंग होत चाललं होतं. त्यातून मार्ग निघण्याची चिन्हे दिसेनात. त्या गाण्याच्या ध्रुवपदात 'आता तरी येशील का' नंतर पुन्हा, 'येशील का' अशी पुनरुक्ती आहे, आणि 'का' वर एक खटका आहे (सा रेग), तो बाबूजींना का खटकत होता समजायला मार्ग नव्हता. त्यांना ती जागा निराळ्या तन्हेने घ्यावी असं वाटत होतं.
मी म्हटलं "ती खटक्याची जागा आपण कायम ठेवू, त्यात एक गंमत आहे." माझा त्या जागेबद्दल इतका अट्टहास का असं त्यांनी म्हटल्यावर मात्र मी त्यांना म्हणालो, "मी नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो, की त्या गाण्याचा संगीतकार मी आहे आणि मला तो खटका उत्तम वाटतो. पं. भीमसेन जोशींनी हे गाणं गाताना तो तसाच घेतला आहे; आणि ते गाणं आधीच लोकप्रिय झालं आहे." बाबूजी म्हणाले, "पण मग मी हे गाणं गात नाही असं म्हटलं तर?" मी म्हटलं, "हा तुमच्या मर्जीचा भाग आहे, म्हणणार नसाल तर आत्ताच तसं सांगा म्हणजे मला दुसरा आवाज शोधायला सोईचं होईल."
मला वाटतं त्या गाण्याचे योग चांगले होते. बाबूजींनी वादविवाद थांबवला आणि म्हणाले "सांगा पुढे." सगळ्यांचा जीव भांड्यात पडला; आणि खेळीमेळीच्या वातावरणात गाण्याची तालीम पूर्ण झाली.
नंतर आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो असताना मी त्यांना म्हटलं "तुम्हाला अभिप्रेत असलेली त्या खटक्याऐवजीची जागा तुम्ही घेतली तर हरकत काही नाही; पण कृपया ती वैविध्य म्हणून घ्या."
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.