A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज सांग लक्ष्मणा जाउं

मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें?

कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे

व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे

अग्‍नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
पदतळीं धरेसी कंप सुटे

प्राण तनुंतून उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती?
बाहतसे मज श्रीभागीरथी
अडखळें अंतिचा विपळ कुठें?

सरले जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हें, सुमन मिटें

वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे

जाइ देवरा, नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हा ही जीभ थटे

इथुन वंदिते मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे

श्रीराम.. श्रीराम.. श्रीराम..
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र जोगिया
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १२/४/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- लता मंगेशकर.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
कनक - सोने.
कांसें (कांस्य) - जस्‍त व तांबे यांच्यापासून होणार्‍या एका मिश्र धातूचे नाव.
जाया - पत्‍नी.
तमिस्‍त्रा - अंधारी रात्र.
नृपति - राजा.
पुनर्जात - पुनर्जनित, पुन्हा उत्‍पन्‍न झालेले / केलेले.
पावक - अग्‍नी.
बाहणे (बाहाणे) - हाक मारणे, बोलावणे.
मरुभूमी - वाळवंट.
विजन - ओसाड, निर्जन.
विपळ - पळाचा साठावा अंश.
शर - बाण.
सुमन - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण